राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट; डिसेंबरपर्यंत सर्व स्थानिक निवडणुका होणार तर दिवाळीनंतर...
मुंबई : राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकींमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी 2011 ची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकींमधील पहिला टप्पा हा जिल्हा परिषदांचा असणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होतील. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबईसह इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होतील, असे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : ‘वाकड्यात काम करण्यासाठी तुम्हाला कृषीमंत्रिपद दिलेलं नाही’; दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावरुन रोहित पवारांची टीका
दरम्यान, डिसेंबर 2025 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. असे असेल तर दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
शासनाचेही आहेत विशेष प्रयत्न
मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर, तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले आहे. सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
29 महापालिकांसह अनेक नगर परिषदांच्या निवडणुका प्रलंबित
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजीसह 29 महानगरपालिका तसेच नगर परिषद व पंचयात समित्यांच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : ‘CM Fadnavis on Manikrao Kokate : बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही…; माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांची चपराक