मुंबई : निवडणूक असो किंवा इतर वेळी देखील एखाद्या विशिष्ट जातीबाबत अर्वाच्य शब्दात भाष्य करणं आजवर अनेक राजकीय नेत्यांना भोवलं आहे. अशातच आता आमदार संग्राम जगताप यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चात केलेली टीका आता त्यांनाच चांगलीच भोवत असल्याचं दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की, शब्द जरा जपून वापरावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वरळी येथीलराष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती यात पक्षाचे सर्व नेते , मंत्रीगण , खासदार , आमदार , जिल्हाध्यक्ष उपस्थित होते , या बैठकीत येत्या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेते , पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना सार्वजनिक वक्तव्य करताना भान बाळगण्यास सांगितले आहे.
या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की ‘ येत्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यासाठीची तयारी आपण सर्वजण आपआपल्या पातळीवर करीत आहोत , आपण सर्वजण जाणता की शेती- शिवरातल्या लोकांच्या समस्या जेव्हा जेव्हा आपण सत्तेच्या माध्यमातून सोडवल्या आहेत. तेव्हा तेव्हा एक २०१४ ची निवडणूक सोडली तर कायम आपल्या पक्षाचा जनाधार कायम राहीला आहे आणि सर्व निवडणुकीत आपल्याला यश मिळाल आहे, आपण नवीन भूमिका घेऊन देखील गेल्या निवडणुकीत एका विश्वासाने लोकांनी आपल्या हातात सत्ता दिली आहे याच भान आपण सर्वांनी बाळगायला हवं.
निवडणुकीत एखाद्या समुदायाने मत दिली नाहीत, म्हणून जर आपण पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेत असू तर ते योग्य नाही , यांची पक्ष दखल घेत आहे यांची सर्वांना जाणीव असू द्या. प्रत्येक निवडणुकीत एखादा समाज घटक आपल्या सोबतच राहतो अस नसत , एका निवडणुकीत त्यांनी मत दिली नाहीत म्हणजे ते आपले शत्रू झालेत असा त्याचा अर्थ होत नाही यांच भान असू द्या. राज्यात सध्या सामाजिक पातळीवर अनेक घटना घडत आहेत, अश्या वेळी सार्वजनिक जीवनात आपण एखाद्या समुदायाबद्दल अथवा जाती – जमाती बद्दल काय बोलतो आहोत त्यांचे काय परिणाम गांव -खेड्यात उमटू शकतात यांची जाणीव सर्वच जबाबदार नेत्यांनी ठेवण आजच्या काळात गरजेच आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्व नेते शेतकऱ्यांची मुलं आहेत , आपल्या सर्वांचा बाज ग्रामीण आहे. अनेकदा एखाद्या कार्यक्रमात आपण मोकळेपणाने बोलतो मात्र त्या विधानांचा पुढचा मागचा संदर्भ न देता मुंबई पुण्यामधली माध्यम आपल चुकीच चित्र रंगवतात. मात्र त्यांचे परिणाम पक्ष आणि पक्षाच्या प्रतिमेवर उमटू शकतात यांची जाणीव आपणा सर्वांना असायला हवी , काहीजण जाणीवपूर्वक वारंवार प्रक्षोभक आणि भावना दुखावणारी विधान करतात मात्र या पुढे या प्रकारच्या गोष्टींना मी वेगळ्या प्रकारे घेईन एवढंच मला सांगायच आहे, पुन्हा एकदा लोकसेवेच्या जबाबदारीची जाणीव असू द्या.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आल्या आहेत. ज्यांच्या जिवावर आपण खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुका लढतो त्या कार्यकर्त्यांना सत्तेच स्थान मिळवून देण्यासाठी या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असतात. गाव -खेड्यात असलेला आपला कार्यकर्ता त्याला -त्या त्या पातळीवर सक्षम करण्याच काम करण्यासाठी आपल्यासाठी या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असतात, हे आपण सर्वच जण जाणून आहात. या निवडणुका जिंकायच्या असतील तर आपल्या लोकांमध्ये जाव लागेल त्यांना भेटाव लागेल त्यांच्या चार दोन गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील.
मी स्वत राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम पुण्यामध्ये सुरू केला आहे , मला या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे , सत्तेत असताना सुद्धा आपला पक्ष आणि नेता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भेटतो आहे आणि त्यांची विचारपूस करतो आहे असा एक चांगला संदेश यातून लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये जात आहे. प्रत्येक जिल्हाध्यक्ष आणि आमदारांनी आपआपल्या भागात हा कार्यक्रम करावा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या सुरवातिच्या काळापासून पक्षाशी एकनिष्ट असणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा.
प्रत्येक मंत्र्यांना आपण जिल्ह्याच्या संपर्कपदाची जबाबदारी दिली आहे , आठवड्यातून एक दिवस त्या त्या मंत्र्याने त्या जिल्ह्यात देत एक एक तालुका भेटी देऊन पूर्ण करीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करायला हव आणि त्याचा फॉलोअप घ्यायला हवा , कोण काय करतंय आणि कोण काय करत नाही यावर पक्षाच लक्ष्य आहे. बूथ आणि युथ दोन्ही मजबूत असतील तर पक्षाला चांगल यश मिळत , स्थानिक स्वराज्य संस्था मधून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने कायम नव्या दमाच्या तरूणांना संधी दिली आहे हे आपल्याला येत्या निवडणुकीत देखील करायच आहे. हेच नवं नेतृत्व उद्याच पक्षाच भविष्य असत त्यामुळे त्यांना संधि , वाव आणि पाठबळ देण हे वरिष्ट नेत्यांच कर्तव्य आहे.
पक्ष बूथ पातळी पर्यंत मजबूत होण्यासाठी आपण आपल्या मतदारसंघात बूथ प्रशिक्षण वर्ग या महिन्यात घेऊन त्यावर काम करायला हवं. निवडणुका जाहीर होण्याअगोदर किमान दोनदा प्रत्येक घरापर्यंत महायुतिने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आणि आपआपल्या मंत्री , खासदार ,आमदार यांनी काय काय काम केली आहेत हे लोकांपर्यंत जायला हवं. स्थानिक पातळीवर त्रयस्थ लोकांकडून आढावा घ्या , शेतकऱ्यांना जी मदत प्रशासनाने जाहीर केली आहे, ती मिळवून देण्यासाठी तालुका पातळीपासून पुढाकार घ्या त्यासाठी मार्गदर्शक शिबिर आयोजित करा , पंचनामे आणि इतर प्रक्रियेचा आढावा घ्या. यश मिळवणं सोप्प असत टिकवण कठीण हे सर्वांनी ध्यानात ठेवायला हवं. ज्या भागात आपला पक्ष कमजोर आहे तिथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्ते उभे करून पक्ष बळकट करण्यावर भर द्यायला हवा.
पक्ष विचारधारा , लोककार्य , कार्यपद्धती आणि कार्यकर्ता या चार खांबावर उभा असतो यातील एकही खांब कमकुवत होऊ देऊ नका. जात – पात , धर्म – पंथ यांच्या पलीकडे सर्व प्रवाहाना सामाहून घेणारा पक्ष अशी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची ओळख व्हायला हवी आणि तीच आपली शक्ति आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक विषय महत्वाचे ठरतात त्यावर तुमच लक्ष्य असू द्या , समस्याच वेळीच निरकारण करा. सत्तेसाठी लोक नाही तर लोकांसाठी सत्ता राबवायची आहे त्यासाठी गांव – खेड्यांपासून आपला पक्ष मजबुतीने उभा राहायला हवा , आपण सर्वांनी यासाठी कंबर कसून कामाला लागूया, असं अजित पवारांनी नेत्यांना मार्गदर्शन केलं आहे.