
Ajit pawar Plane crash News Update,
Ajit Pawar Funeral: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा दुःखद अंत झाला आहे. उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाने राज्याला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. उद्या सकाळी ११ वाजता बारामती येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात शोकाचे वातावरण पसरले. रुग्णालयाबाहेर कुटुंबातील सदस्य आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. अजितदादांचे कार्यस्थळ असलेल्या बारामतीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बारामती जिल्हा रुग्णालयातून अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथील मैदानाकडे नेले जात आहे. विद्या प्रतिष्ठान येथे त्यांचे पार्थिंव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अॅब्युलन्समध्ये अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेतेमंडळीही आहेत. अॅब्युलन्सच्या चारही बाजूला अजित पवार यांचे कार्यकर्ते जमले असून “अजित दादा परत या” अशी घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीतील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. आज बुधवारी संध्याकाळपासून त्यांचे पार्थिव विद्या नगरी चौकातील विद्या प्रतिष्ठान येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. आज रात्री उशिरापर्यंत नागरिकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहेत. उद्या सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. विद्या प्रतिष्ठान चौकापासून भिगवण रोड सेवा रस्त्यावरून ही अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर सकाळी ११ च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासकीय आणि कौटुंबिक पातळीवर तयारी सुरू आहे. एकीकडे बारामतीतील विद्या प्रतिष्ठाच्या मैदानात तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबियांचे मुळ गाव असलेल्या काटेवाडीतही वेगाने घडामोडी सुरू आहेत. काडेवाडीतील त्यांच्या मुळ निवासस्थानाशेजारी असलेल्या गावातही मोठी तयारी सुरू आहेत, घराशेजारील संपूर्ण शेतजमीन नांगरून सपाट करण्यात आली आहे.
बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अजित पवारांच्या समर्थक, चाहते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत आहेत. अजित दादा परत या, अजित दादा अमर रहे या घोषणांमधून त्यांचे कार्यकर्ते भावना व्यक्त करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संपूर्ण बारामती शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा परिणाम पुणे जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातही दिसत आहे.