Manda Mhatre responded to Ganesh Naik's criticism of Eknath Shinde
सिद्धेश प्रधान : नवी मुंबई : पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणेकरांवर शाब्दिक हल्ला केला. गणेश नाईक यांनी नाव न घेता कोविड काळात बाहेरील नेत्यांनी आमची औषधे चोरली, पाणी चोरले, ऑक्सिजन चोरला. एवढ्यावर न थांबता नवी मुंबईकरांच्या सोयी सुविधांसाठी असलेले आमचे भुखंड देखील विकासकांच्या घशात स्वतःच्या स्वार्थासाठी घातले. कोविड काळात सिडकोने नवी मुंबईला प्राधान्य न देता मुंबई, ठाण्यात निधी दिला असाही आरोप गणेश नाईक यांनी केला.
गणेश नाईकांनी या आधी देखील अशीच टीका एकनाथ शिंदेंवर नाव न घेता केली होती.त्यावेळी त्या टीकेला खासदार नरेश म्हस्के व जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी प्रत्युत्तर दिलेले होते. मात्र शनिवारी देखील गणेश नाईक यांनी पुन्हा ठाणेकरांवर तोंडसुख घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी थेट स्वपक्षीय आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना प्रत्युत्तर देत, नाईक यांनी चोरांचे नाव घ्यावे असे आवाहन दिले. त्यामुळे ठाणेकरांवर नाईकांचा प्रहार मात्र प्रत्युत्तर आमदार मंदा म्हात्रेंचे असे चित्र नवी मुंबईत पाहायला मिळाले.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या बोलण्यातून सातत्याने एकनाथ शिंदेंवर प्रहार केला जात आहे. गणेश नाईकांना आगामी निवडणुकींच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचे भाजपाचे संपर्क नेतेपद देण्यात आले आहे. भाजपाने दिलेली जबाबदारी तंतोतंत पाळत गणेश नाईक अनेक प्रकारे एकनाथ शिंदे यांना आव्हान देत आहेत. एका कार्यक्रमात तर थेट मला देखील मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता होती, याबाबतचे किस्से नाईक यांनी उपस्थितांना सांगितले होते. त्यावेळी राजकारणात कनिष्ठ असलेल्या व मुख्यमंत्रीपद भूषविलेले एकनाथ शिंदे यांच्याशी तुलना करण्याचा नाईक यांनी प्रयत्न केल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. सध्या नवी मुंबई पालिकेवर एकनाथ शिंदेंच्या मर्जीतील प्रतिनियुक्तीवरील अधिकारी बसल्याने, नाईकांच्या सत्तेला काहीसा अंकुश लागलेला पाहायला मिळत आहे. कोविड काळात तसेच, एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ही बाब प्रकर्षाने जाणवत होती. त्यावेळी देखील सातत्याने नाईक यांच्याकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांवर आरोप केले जात होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पालिकेची सूत्र मंत्रालयातून हाकली जात असल्याचा आरोप नाईक करत होते. मात्र सध्या नाईक वनमंत्री झाले असले व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी नाईकांच्या या आरोपात खंड पडलेला नाही. नाईक सातत्याने सिडको व पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आले आहेत. एकीकडे नाईक सातत्याने शिंदेवर आरोप करत असताना दुसरीकडे शिंदेंकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मंदा म्हात्रेंचे नाईकांना आव्हान
याआधी वनमंत्री नाईक यांनी भावे नाट्यगृहात ठाणेकरांवर आरोप केले होते. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी गणेश नाईकांचे नाव घेत त्यांना हिंमत असल्यास नाव घेऊन आरोप करावेत. मग कोणी काय पळवले, हडपले, चोरले ते आम्ही उघड करू असे आवाहन दिले होते. त्यास खा. म्हस्केंची साथ पाटकरांना मिळाली होती. मात्र शनिवार ता.१९ रोजी झालेल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा नाईक यांनी ठाणेकरांवर आरोप केले. यावेळी मात्र नाईक यांना स्वपक्षातून थेट आव्हान मिळाले. आ. मंदा म्हात्रे यांनी नाईक यांनी नाव घेत चोर कोण आहेत ते सांगावे. जनता हुशार आहे. नवी मुंबईत कोणी काय चोरले हे सर्वांना माहीत आहे. नेहमी बैठका घ्यायच्या आणि अधिकाऱ्यांवर आरोप करायचे हेच रडगाणे सुरू असल्याचा असा टोला आ. म्हात्रे यांनी गणेश नाईकांना लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
…..तर यापुढे गप्प बसणार नाही
नुकतेच देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विमानतळाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आम्हा चारही आमदारांना आमंत्रित केले होते. यावरून नेत्याचे मोठेपण सर्वसमावेशक नेतृत्व दिसून येते. मात्र माझ्या मतदार संघात कार्यक्रम घेत मलाच अनेकदा डावलण्यात येते. कदाचित ती त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी समस्यांबाबत बैठक बोलवली असल्याने मला बोलावले नसेल. मात्र माझ्या कार्यकर्त्यांना तरी बोलावयाचे, मी अनेक कार्यक्रमांना त्यांना मान देत असते. मात्र त्यांच्याकडून ही कृती दिसून येत नाही. कधी सभागृहात देखील टोमणे मारणे अशी कृत्ये मी केली नाही. आगामी निवडणुका पाहता एकाच पक्षात राहून अशी कृत्ये करणे चुकीचे असून मोठ्या नेत्यांनी मोठेपण जपावे असेदेखील आ. म्हात्रे म्हणाल्या.यावेळी मी गप्प बसले तर पुढील वेळेस गप्प बसणार नाही असा इशारा आ. म्हात्रेंनी दिला.