
काही दिवसांपूर्वी मराठी एकीकरण समितीने माध्यमांसमोर भूमिका मांडत, महापौर मराठी न झाल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला होता. हे आंदोलन मराठीसाठी रक्तरंजीतही होऊ शकते, असे विधान केल्याने शहरातील राजकीय वातावरण आधीच तापले आहे. त्यातच आता मनसेनेही हीच मागणी पुढे रेटल्याने वादाला आणखी धार आली आहे.
मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मीरा-भाईंदर शहर हे महाराष्ट्रात असून राज्याची मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे शहराच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणारा महापौर मराठी माणूसच असावा, ही मराठी समाजाची ठाम भावना आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवून मोठे यश मिळवले असल्याबद्दल आमदार नरेंद्र मेहता यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मात्र, महापौर निवडीत मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
आमदार नरेंद्र मेहता यांना मराठी भाषा, मराठी संस्कृती व मराठी माणसाबद्दल आपुलकी असल्याचे आम्हाला ज्ञात आहे. त्यामुळे महापौरपदी मराठी व्यक्तीचीच निवड केली जाईल, असा विश्वासही मनसेने निवेदनातून व्यक्त केला आहे. मात्र, महापौरपदी मराठी व्यक्तीची निवड न झाल्यास शहरातील नागरिकांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
इतर भाषिक व्यक्तीची महापौरपदी निवड झाल्यास मराठी महापौरासाठी आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन व सत्ताधारी पूर्णतः जबाबदार राहतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत पोलीस आयुक्त (मीरा-भाईंदर–वसई-विरार) तसेच नवघर, कनकिया, काशिमीरा, काशीगाव आणि नयानगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आली आहे.
महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध इतर भाषिक असा नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.