KDMC Election 2026: केडीएमसीवर महायुतीचा झेंडा! पण महापौर खुर्चीसाठी अजून सस्पेन्स कायम (फोटो-सोशल मीडिया)
KDMC Election 2026: अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली केडीएमसी निवडणूक पार पडली. निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाईच्या महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामी आता महायुतीचाच महापौर महापालिकेत बसेल असा स्पष्ट मत भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. परंतु, याबाबतचे सर्व निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील तो आम्हाला बंधनकारक असेल असेही स्पष्ट केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १२२ प्रभागातून शिवसेना (शिंदे गट)-५३, भाजपा-५०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे- ११, मनसे- ५, काँग्रेस- २, राष्ट्रवादी (शप) १ असे यश मिळविले आहे. महापौर बसण्यासाठी कालावधी का लागत आहे अशी चर्चा शहरात होत आहे. निवडणुकीपूर्वी आमच्याच पक्षाचा महापौर बसणार असे खुद्द भाजपाने सांगितल्याने महायुतीत दोन्ही पक्षात दावे प्रतिदावे होत होते.
निवडणुकीत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच कुटुंबातील तिन्ही उमेदवारांना मतदारांनी निवडून दिले आहे. पण हे तिन्ही उमेदवार कोणत्या एकाच पक्षाचे नाहीत तर ते वेगवेगळ्या पक्षातील आहेत. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे असे असल्यानं वेगवेगळ्या पक्षातून निवडून आणण्याची खेळी यशस्वी झाली. प्रभागातील मतदारांकडून भाऊ, पत्नी आणि सून अशा तिघांनाही निवडून आणण्यास कुटुंबातील नेतृत्व सफल झाले अशी चर्चाही शहरात जोरात आहे.
परिणामी इच्छुक उमेदवारांमध्येही स्पर्धा होती. अनेक इच्छुक उमेदवारांनी लढण्याची तयारी ठेवली होती. परंतु भाजपा व शिवसेना (शिंदे गट) वरिष्ठांनी महायुतीत निवडणुका लढण्याच्या निर्णयाने इच्छुकांची तारांबळ झाली. अखेर इच्छुक उमेदवारांनी दलबदल करीत निवडणूक लढण्यासाठी पक्षनिष्ठा डावलून पक्ष सोडून इतर पक्षात उड्या मारल्या. मात्र अशा अनेकांना मतदारांनी या निवडणुकीत धडा शिकवला आहे त्यांना घरी बसविले. या खेळात काही वजनदार व्यक्तिमत्व राजकारणातून दूर फेकले गेले आहेत.काहींनी आम्हाला पक्षातून योग्य वागणूक मिळाली नाही अशी बोंब केली. पण आता त्याचा काहीच फायदा झाला नाही. मात्र, या निवडणुकीच्या खेळात मतदारांनी काम करणाऱ्यांना स्वीकारल्याचे निवडणुकीतील विजयामुळे सामोरे येत आहे.
शनिवारी विजयी उमेदवार आपापल्या मुख्य नेत्यांची भेट घेण्यासाठी सकाळीच रवाना झाले. यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भेट घेण्यासाठी कल्याण शीळ रोडवरील पलावा येथील बंगल्यात गेले होते. चव्हाण यांचे आशीर्वाद घेतले खूप आनंद वाटला अशी माहिती समोर येत आहे. तर शिवसेना (शिंदे गट) नवनियुक्त नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदेव्यांचे आशीर्वाद घेतले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे मनसेच्या नगरसेवकांनी राज ठाकरेंच्या यांच्या शिवतीर्थ येथे असता त्यांचे औक्षण करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. परिणामी आता आम्ही प्रभागातील विकासकामांसाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहू असेही सांगितल्याचे समजून येत आहे.






