Mla Rohit pawar Allegation on Sanjay Shirsat Land Scam Bivalkar Family Mumbai news
Sanjay Shirsat Lamd Scam : मुंबई : मागील अनेक दिवसांपासून महायुतीमधील नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मंत्रिमंडळामधील अनेक नेत्यांचे घोटाळे समोर आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय गायकवाड हे चर्चेमध्ये आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगांसोबतचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यावरुन जोरदार राजकारण देखील तापले आहे. आता संजय शिरसाट यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. आमदार रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर जमिनीच्या घोटाळ्याबाबत मोठा आरोप केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कोट्यवधींचा जमीन घोटाळा समोर आणणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर आता रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. रोहित पवार म्हणाले की, मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४ हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली, परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करुन ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केला. त्यालाही त्या त्या टप्प्यावर नकार मिळाला, पण विद्यमान मंत्री संजय शिरसाठ साहेब यांनी २०२४ मध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील सुमारे १५ एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे रोहित पवार म्हणाले की, “या जमिनीचा बाजारभाव सुमारे ५ हजार कोटी रुपये असून या जमिनीवर सिडकोला गरीबांसाठी सुमारे १० हजार घरं बांधता आली असती, पण गरीबांच्या हक्काची जमीन शिरसाठ साहेब यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली. एकीकडं ५ हजारहून अधिक स्थानिक भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करत आहेत त्यांना जमीन दिली जात नाही पण मराठा साम्राज्याविरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत जमीन दिली जाते, ही एकप्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे. त्यामुळं बेकायदा पद्धतीने बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाठ यांचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे रोहित पवार यांनी या विरोधात आवाज उठवणार असल्याचे देखील जाहीर केले. त्यांनी सांगितले की, “नवी मुंबई परिसरातील गरीब आणि सामान्य आगरी समाजातील नागरिकांच्या घरांसाठीची सिडकोची सुमारे ५ हजार कोटी रुपये बाजारभाव असलेली १५ एकर जमीन मंत्री संजय शिरसाठ यांनी इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाच्या वारसांच्या घशात घातली. याविरोधात #मविआ च्यावतीने बुधवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता नवी मुंबई येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी अधिकाधिक संख्येने यामध्ये सहभागी व्हावं,” असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी मुंबईकरांना केले आहे.