महायुती सरकारच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून अभियान सुरु केले (फोटो - सोशल मीडिया)
Ladki Soon Abhiyan : मुंबई : महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून ही योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलेला दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेमध्ये मोठे यश मिळाले. लाडक्या बहिणींनी आशिर्वाद दिल्यामुळे महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आले. आता राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. दरम्यान, महायुती सरकारकडून लाडकी सून अभियान सुरु करण्यात येणार आहे.
ठाण्यामध्ये माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारकडून लाडक्या सूनांसाठी खास अभियान सुरु केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महिला वर्गामध्ये एकच कुतूहल निर्माण झाले आहे. या अभियानाबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाण्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून अभियानाची घोषणा केली. याबाबत त्यांनी माहिती देखील दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आजपासून आपण नवीन अभियान सुरू करत आहोत. ते लाडक्या सुनेंसाठी महत्त्वाचे आहे. सासर काहीं वाईट नसते, पण काही मोजक्या ठिकाणी अप्रिय घटना घडत असतात. आपली मुलगी जशी लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी व्हावी, यासाठी शिवसेनेने हेल्पलाईन सुरू केली आहे”, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची घोषणा केली आहे.
पुढे ते म्हणाले की, ज्या सुनांना अडचण येईल, त्यांनी न घाबरता या क्रमांकावर फोन करावा त्यांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. लाडकी सून अभियानामार्फत पीडित सूनेला सुरक्षा दिली जाईल. ज्या सूना आहेत, त्याही माझ्या लाडक्या बहिणी आहेत. एकनाथ शिंदे त्यांचा भाऊ आहे. कुणीही त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करेल, त्याची गाठ शिवसेनेशी आहे, हे मी सांगतो, असे स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी व्य़क्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही जाहीर झाल्यापासून चर्चेस कारण ठरली आहे. यामुळे महायुतीच्या पदरात विधानसभा निवडणुकीचे यश पडले आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लाडकी सून अभियान किती महत्त्वाचे ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी?
लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारने बराच उशीर लावला. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे हे बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात आले. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा किती तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार याची बहिणींना प्रतिक्षा लागली आहे.