दिवाळीच्या शुभेच्छा आणि बरच काही...! विधानसभा निवडणूकीसाठी मनसेचा ठाकरे गटाला पाठींबा?
अंबरनाथ/ दर्शन सोनवणे : कानसई विभागात मनसेच्या वतीने मोहणपुरम रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला होता. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील या दीपोत्सवाला भेट दिली. यावेळी आमदार पाटील यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखडे देखील उपस्थित होते. मनसेने अंबरनाथ विधानसभेत एकही उमेदवार दिलेलाा नाही. तसंच पक्षाने अद्याप तसे आदेशही दिलेले नाहीत. त्यामुळे मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना नक्कीच मदत करणार, असं वक्तव्य आमदार राजु पाटील यांनी केलं आहे. पाटीलांच्या या वक्तव्याला प्रतिक्रिया देेत वानखेडे म्हणाले की, सर्वच मनसैनिक माझे मित्रच आहेत त्यामुळे ते नक्कीच माझ्यासोबत राहतील. असा विश्वास राजेश वानखडे यांनी व्यक केला. त्यामुळे आता लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे वानखेडेंना कीती मदत करणार हे आगामी निवडणूक काळात स्पष्ट होईल.
हेही वाचा-प्रकाश आंबेडकर यांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत..; ठाकरे गटाने लगावला टोला
शिवसेनेच्या फुटीनंतर राजेश वानखडे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. २०१४ साली वानखडे यांनी भाजप मधून निवडणूक लढवली होती, त्यावेळी वानखडे यांनी आमदार किणीकर यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण केलं होतं. किणीकरांना २०१४ साली विधानसभा निवडणुकीत ४७ हजार मते मिळाली होती, तर वानखडे यांना ४४ हजार ९५९ इतकी मते मिळाली होती. त्यामुळे या लढतीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर २०१९ साली विधानसभा निवडणूकीत किणीकरांना ६०,०८३ तर काँग्रेसच्या रोहित साळवेंना ३० हजार ७८९ मते मिळाली होती.वंचित बहुजन आघाडीचे धंनजय सुर्वे यांना देखील १६ हजार २७४ मतं मिळाली होती. मात्र आता किणीकरांच्या विरोधात ठाकरे गटाने किणीकरांना २०१४ साली टक्कर देणाऱ्या राजेश वानखडे यांना उमेदवारी देऊन किनीकरांना पुन्हा आव्हान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील वनखडेंना मित्र म्हणून मदत करणार असं वक्तव्य केलं. त्यामुळे आता किणीकरांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत राजेश वानखडे आणि विद्यमान आमदार डॉ. किणीकर यांच्यात होणारी लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या संकल्पनेतुन मागील चार वर्षांपासून दीपोत्सव साजरा होत असून अंबरनाथकरांनी देखील या दीपोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. शनिवारी आमदार राजू पाटील यांनी या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी जत्रेतील खेळणी, सेल्फी पॉईंट अशी व्यवस्था करण्यात आली होती.