अजित पवार व शरद पवार यांनी पहिल्यांदा वेगळा दिवाळी पाडवा केला साजरा (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : दिवाळीचा उत्सव संपूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा केला जात आहे. आज (दि.02) पाडवा असून उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. राजकीय घराणं असलेल्या पवार कुटुंबातील पाडवा देखील नेहमी चर्चेचा विषय ठरतो. पण आता पवार कुटुंबामध्ये दोन पाडवा साजरे केले जात आहेत. राजकारणातील ही लढाई आता कुटुंबामध्ये आली असून पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा साजरा केले आहेत.
अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीमध्ये बंड केले. यामुळे पक्षामध्ये दोन गट पडले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा करुन पक्ष मिळवला. तर शरद पवार यांनी त्यांचा वेगळा पक्ष सुरु ठेवला. नेहमी एकत्रित असणारे हे नेते एकमेकांविरोधात निवडणुकीमध्ये उभे राहिले. लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये म्हणजेच पवार कुटुंबामध्येच लढत झाली. आता विधानसभा निवडणुकीला देखील पवार कुटुंबामध्ये लढत होणार आहे. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतण्या युगेंद्र पवार लढत देणार आहे. आता पवार कुटुंबातील ही राजकारणातील लढाई घरामध्ये देखील सुरु झाली आहे. आता पवार कुटुंबामध्ये दोन पाडवा साजरा केला जात आहे.
बारामतीकर माझा परिवार..!
आज दीपावली पाडवा सणाच्या निमित्तानं काटेवाडी येथील निवासस्थानी माझ्या बारामतीकरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या शुभप्रसंगी बारामतीकरांना ही दिवाळी सुखाची, समाधानाची, समृद्धीची, आर्थिक भरभराटीची, आरोग्यदायी जावो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. मोठ्या… pic.twitter.com/RRJFIXvRFr
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 2, 2024
शरद पवार यांचा पाडवा गोविंदबाग येथे तर अजित पवार यांनी काटेवाडी येथे आपल्या वेगळ्या दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. यामुळे आता पवार कुटुंबाचे दोन दिवाळ पाडवा साजरा केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना पार्थ पवार म्हणाले की, “दोन दिवाळी पाडवा आता इथून कायम राहणार आहेत. कार्यकर्त्यांची भावना होती की आपण वेगळा पाडवा करायला पाहिजे. त्यानुसार अजितदादांनी निर्णय घेतला. आपण आता हे कायम करणार आहोत. एकत्र पाडवा केला असता तर जनतेत संभ्रम निर्माण झाला असता. दोन पक्ष आणि एकत्र येतात हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. त्यांचा आणि आमचा पक्ष आता वेगळा आहे. त्यामुळे इथून पुढे हे दोन पाडवे साजरे होणार आहेत,” असे स्पष्ट मत पार्थ पवार यांनी मांडले आहे.
पुढे पार्थ पवार म्हणाले की, “आम्ही इथून पुढे पाडवा वेगळा करणार असलो तरी मात्र कुटूंब म्हणून आम्ही एकच आहोत. जेव्हा काही फॅमिली कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही एकत्र येऊ. पण आता आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. कधी जुळणार नाहीत, असं पार्थ पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. मी शरद पवार यांना भेटायला नेहमी जातो. यावेळी पण जाणार आहे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायला पाहिजे. पण युगेंद्र पवारांना दिलेली उमेदवारी आम्हाला आवडलेली नाही. मात्र आता सामोरं जावं लागणार आहे. हे आता कायम असणार आहे. हे थांबायला पाहिजे होतं. मात्र आता थांबणार नाही. एकत्र येण्यासाठी आपण प्रयत्न केलेत. मात्र यश आलं नाही, आता विषय सोडला आहे,” असे मत पार्थ पवार यांनी मांडले. त्यामुळे आता राजकारणातील विरोधी भूमिका ही परिवारामध्ये देखील झाली असल्याचे दिसत आहे.
सुप्रिया सुळेंचा टोला
अजित पवार यांच्या काटेवाडीतील दिवाळी पाडव्यावर शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अगदी दोन शब्दांमध्ये अजित पवार यांच्या वेगळ्या दिवाळी पाडव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, घरं फोडणे, पक्ष फोडणे असले उद्योग दिल्लीची अदृश्य शक्ती करते. त्यामुळे हे सगळं दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे यश आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.