
'जयकुमार गोरे हे संधीसाधू, त्यांना आमिष दाखवलं गेलं म्हणून ते...'; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
सोलापूर : सोलापुरात काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून, त्यानंतर प्रणिती शिंदेंनी जयकुमार गोरेंचा उल्लेख करत ते काँग्रेस कार्यकर्ते होते, असे म्हटले. यावर प्रतिक्रिया देत असताना गोरेंनी ‘प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचे वाटोळे केले’, अशी घणाघाती टीका केली. त्यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी गोरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘जयकुमार गोरे काय बोलतात, त्याकडे मी लक्ष देत नाही. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं होतं. ते स्वतः काँग्रेसचे होते. कदाचित त्यामुळे त्यांनी ते पत्र वाचलं असेल. पण ते संधीसाधू आहेत. त्यांना आमिष दाखवण्यात आलं, म्हणून ते भाजपमध्ये गेले’, असे शिंदे म्हणाल्या.
मंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेला प्रणिती शिंदेंनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, गोरे हे संधीसाधू आहेत. त्यांना आमिष दाखवण्यात आलं, म्हणून ते भाजपमध्ये गेले. त्यांची संस्कृती काय आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीने निवडणूक लढवली, यावरून ते स्पष्ट होतं. सोलापूर हे सांस्कृतिक शहर आहे. बाहेरून आलेल्या लोकांना येऊन त्याची पातळी कमी करण्याचा अधिकार नाही. मी मतदानाच्या दिवशी सांगितलं होतं की सत्ता काही लोकांनी पहिल्यांदाच पाहिली आहे. ही सत्ता कदाचित त्यांच्या डोक्यात गेली आहे’.
दरम्यान, जिथे आघाडी होऊ शकते, तिथे आम्ही आघाडी करू. भाजपने कितीही साम, दाम, ईव्हीएम वापरलं तरी काँग्रेस लढणार आहे. ही तत्वांची लढाई आहे. आम्ही लढू, आम्ही हरू; पण आम्ही लढणारच. जिंकण्यासाठी लढाई असते, त्यांना टक्कर देणं गरजेचं आहे. ग्रामीण आणि शहरी भागाचा मतदान पॅटर्न वेगळा आहे. ग्रामीण भागात प्रचंड रोष आहे. सर्वसामान्य लोकांची लढाई आम्ही लढणार आहोत, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते मंत्री गोरे?
ज्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती, त्या त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्या. ८७ नगरसेवक आलेल्या भाजपवर त्या टीका करत आहेत. मी बोललो तर त्यांना लागायचे काही कारण नाही. एवढा मोठा पराभव झाला तर ते स्वीकारायाला हवे. पालकमंत्र्यांनी गल्ली-बोळात जाऊन पैसे वाटले वगैरे त्यांनी म्हटले, त्यावेळी त्या सन्मानाने बोलत होत्या का? तुम्ही दुसऱ्याचा सन्मान करा मग तुमचा ही सन्मान होईल, असा पलटवारही गोरेंनी प्रणिती शिंदेंवर केला.
प्रणिती शिंदेंनी आत्मपरीक्षण करावे
आपण लोकसभेला कुठे-कुठे चर्चा केल्या होत्या, हे सांगायला मला भाग पाडू नका. मी संधीसाधू आहे की काय आहे, हे भाजपला चांगले माहिती आहे. मी जिथे आहे तिथे चांगले काम करतो, ताईंनी आत्मपरीक्षण करावे, कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवता. बघा आपला घरं आणि अवस्था काय आहे, दोन नगरसेवक आलेत त्यांना आधी टिकवा, अशा शब्दांत गोरेंनी प्रणिती शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
हेदेखील वाचा : Mira Bhayander : महानगरपालिकेतील राजकारण विकोपाला; मराठी महापौराच्या मागणीवरून मनसेचं आमदार नरेंद्र मेहता यांना निवेदन