MP Sanjay Raut demand to send an all-party delegation to China and Turkey political news
मुंबई : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 100 अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व देशांपर्यंत पोहचवण्यासाठी हे शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी खासदारांचा देखील समावेश आहे. भारताची भूमिका आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती इतर देशांपर्यंत पोहचवणे हे या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट्य आहे. आजपासून (दि.21) हे शिष्टमंडळ परदेशी दौऱ्यावर रवाना झाले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेत गंभीर टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच परदेशी पाठवलेल्या शिष्टमंडळावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुवर्दींचा देखील समावेश आहे. यानंतर देखील संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, “शिष्टमंडळावरून केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत. आता मला कुणावरही टीका करायची नाही. पण ज्या प्रकारे हे शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही. ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, असे देश निवडण्यात आले आहेत,” असा मुद्दा खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “जागतिक स्तरावर काही प्रमुख देश नक्कीच महत्वाचे आहेत. मग तुम्ही श्रीलंकेला शिष्टमंडळ पाठवले का? म्यानमारला पाठवले का? सगळ्यात आधी तुम्ही शेजारच्या राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवायला पाहिजे. तुम्ही चीन, तुर्कस्थानलाही शिष्टमंडळ पाठवयला पाहिजे. भले त्यांनी पाकिस्तानला मदत केली असेल. चीन, तुर्कस्थानलाही सांगायला हवे की पाकिस्तानला मदत करून तुम्ही चूक करीत आहात. नेपाळ सारखे राष्ट्र आपल्या शेजारी आहे. जे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाते. नेपाळही शत्रूच्या कच्छपी लागले आहे. तिथेही शिष्टमंडळ पाठवले पाहिजे,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही त्या देशात जाऊन आधी पाकिस्तानचा मुखवटा फाडायला हवा. पण तुम्ही जे काही टूर अँड ट्रॅव्हर्स कंपनी उघडून खासदारांना तिथे पाठवले आहे, त्यामुळे भविष्यात काही फायदा होईल असं मला वाटत नाही. या सरकारने शिष्टमंडळावर ज्यांना पाठवायचे आहे, त्यांची निवड करताना त्या त्या पक्षाच्या प्रमुखांशी सुरुवातीला चर्चा केली नाही. जर आमच्याकडे, आमच्या पक्षप्रमुखांकडे किंवा इतर पक्षाच्या प्रमुखांकडे त्यांनी ज्येष्ठ, अनुभवी सदस्यांची नावे मागितीली असती तर त्यांना आम्ही अधिक चांगल्या प्रकारे नक्कीच सहकार्य केले असतं,” असे देखील मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.