Ichalkaranji Election : भाजप आमदार राहुल आवाडे 'ॲटिव्ह'; तर सेनेचे खासदार धैर्यशील माने 'गायब'
कोल्हापूर / राजेंद्र पाटील : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात, असे जाहीर मंचावर सातत्याने सांगितले जाते. मात्र प्रत्यक्ष मैदानात चित्र वेगळेच दिसत आहे. एका बाजूला भाजपामध्ये नियोजनबद्ध तयारी, नेतृत्वाची स्पष्ट भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत असताना, दुसऱ्या बाजूला शिवसेना (शिंदे गट) मधील खासदारांच्या अनुपस्थितीमुळे अस्वस्थता आणि नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे. याच विरोधाभासामुळे महायुतीत हा फरक का ?”असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार राहुल आवाडे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच संपूर्ण प्रभाग रचनेचा सखोल अभ्यास केल्याचे दिसते. प्रत्येक प्रभागातील सामाजिक समीकरणे, मतदारांची मानसिकता, मागील निवडणुकांचे निकाल, संभाव्य बंडखोरी आणि विजयाची शक्यता या सर्व बाबींचा विचार करून उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. केवळ नावांची यादी जाहीर करणे नव्हे, तर ‘विजयाचे मेरिट’ लावून उमेदवार ठरविण्यात आल्याने भाजपामध्ये समाधान आणि आत्मविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच माजी आमदार सुरेश हाळवणकर हे सक्रियपणे सहभागी होते. बैठका, प्रभागनिहाय आढावे, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून भूमिका बजावली आहे. त्यामुळे ‘नेतृत्व आमच्यासोबत आहे’ ही भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
निवडणूक केवळ उमेदवारांची नसून संपूर्ण संघटनेची
निवडणूक ही केवळ उमेदवारांची नसून संपूर्ण संघटनेची असते, हे भाजपने या तयारीतून दाखवून दिले आहे. तरीही अनेक प्रभागात निष्ठावंत भाजपचे इच्छुक उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले. अद्याप त्यांची नाराजी दूर झाली नाही. या नाराजीवर वरिष्ठ नेत्यांनी चिंतन केले. मात्र, त्याचा तपशील उघड केला नाही. याच्या अगदी उलट चित्र शिवसेना (शिंदे गट) मध्ये पाहायला मिळत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या कोणत्याच निर्णय प्रक्रियेत सहभागी नसल्याने पक्षांतर्गत नाराजी आज स्पष्टपणे दिसते. उमेदवार निवड, प्रभाग रचना, स्थानिक समन्वय किंवा कार्यकर्त्यांना दिशा देणे या कोणत्याही टप्प्यावर खासदारांची ठोस उपस्थिती जाणवत नसल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने






