mp sanjay raut press confernce on maharashtra Local Government Elections 2025
मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीकडून केला जातो. यानंतर आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यामध्ये देखील अशाच पद्धतीचा ईव्हीएम मशीनचा घोटाळा होणार असल्याची शक्यता असल्याचा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “निवडणूक आयोग हा त्यांचा गुलाम आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत EVM यंत्राचा वापर होईल. पण व्हीव्हीपॅट मशीन लावणार नाही. म्हणजे कोणाला मत दिलं हे तुम्हाला कळणार नाही. मग निवडणुका घेताय कशाला? निवडणूक मतमोजणीला, प्रक्रियेला उशीर होतो. उशीर होत असेल तर सरळ मतपत्रिकेवर निवडणुका घ्या. EVM कुठून आणणार तर मध्य प्रदेशातून. ज्या मध्य प्रदेशात सर्वात मोठा EVM घोटाळा झाला. त्या ईव्हीएम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं निवडणूक आयोगाने ठरवलं आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले असून या आठवड्य़ातील त्यांचा दुसरी दिल्ली वारी आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीत बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खासकरुन शिंदेसेनेला त्यांच्या प्रमुखांना इथे येऊन बसावच लागेल. त्यात नवीन काय आहे, त्यांच्या पक्षाच मुख्यालय दिल्लीत आहे. म्हणून शिंदे जर आले असतील, तर तो उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याशी योगायोग समजू नये. त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं. भाजपच्या इतर नेत्यांना हायकमांडना भेटण्यासाठी दिल्लीत थांबाव लागतं. रात्री-अपरात्री वाट बघावी लागते. गवतावर बसावं लागतं. हा दिल्लीचा इतिहास आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, “महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडण्याइतकी मोठी माणसे सरकारमध्ये नाहीत. ती धरुन बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत. महाराष्ट्राला महान माणस देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती. ती भाजपमुळे खंडीत पावली. सगळे खुजे बुळे लोक सरकारमध्ये येऊन बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलं आहे. राहुल गांधी वारंवार सांगतात कोई बडा खेला होनेवाला है, ते महाराष्ट्रात नाही, दिल्लीत होणार आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला.