Kolhapur News : शिरोळ तालुक्यातील अकिवाट परिसरात आढळली भलीमोठी मगर; पूल पार करत असतानाच...
कुरुंदवाड : अकिवाट (ता.शिरोळ) येथील राजापूर रस्त्यावर पुलालगतच्या परिसरात रात्रीच्या सुमारास एक मगर पूल पार करत असल्याचे दृश्य शेतकऱ्यांना दिसून आले. अचानक रस्त्यावर समोर आलेल्या या मगरीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतीसाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राजापूर रस्त्यावर आढळलेली ही मगर अतिशय मोठ्या आकाराची असून, पूल ओलांडताना जवळच असलेल्या शेतामध्ये उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांनी पाहिले. सदर ठिकाण कृष्णा नदीच्या ओतावर असून, मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे पाण्याची पातळी वाढली होती. सध्या पाण्याची पातळी घटल्यामुळे मगरींचा नैसर्गिक अधिवास बाधित झाला आहे. परिणामी, नव्या अधिवासाच्या शोधात मगर मानवी वस्तीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
पुलाखाली दाट गवत व झाडी असल्याने या ठिकाणी मगरी वावरत असण्याची शक्यता अधिक असून, शेतकरी वर्गात याबाबत चर्चा रंगत आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणारे शेतकरी यांच्यासाठी ही घटना अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीती व अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे.
मगरीला सुरक्षित ठिकाणी हलवावं
या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे मगरीला तातडीने सुरक्षितरित्या पकडून इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात माजी सरपंच विशाल चौगुले यांनी वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पथक पाठवावे. मगरींच्या संख्येवर व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे, पाण्याच्या ठिकाणी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
खानू गावात बिबट्याचा वावर
दुसरीकडे बिबट्याचा वावरही वाढताना दिसत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानू गावच्या हद्दीतील महामार्ग लगतच्या एका घराच्या बाहेर असलेल्या तीन कुत्र्यांवर बिबट्याने मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान येऊन हल्ला केला. त्यातील एका कुत्र्याला ठार मारून बिबट्या घेऊन गेला तर दुसऱ्या दोन कुत्र्यांना जखमी केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. महामार्गालगत भर वस्तीत बिबट्याने थेट घरासमोरील भागात येऊन अशाप्रकारे केलेल्या हल्ल्यामुळे सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याच्या अस्तित्वामुळे भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.