
MP Sharad pawar birthday special article on political journey of baramati leader
Sharad Pawar Birthday : महाराष्ट्रातील जेष्ठ राजकीय नेते शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार हे त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज्यासह केंद्रीय राजकारण फिरवण्याचे सामर्थ्य ठेवणारे शरद पवार यांनी 63 वर्षे राजकारण केले. राजकारातील प्रत्येक चाल आधीच ओळखून त्याप्रमाणे राजकारण करणाऱ्या शरद पवारांनी अनेकांना मात दिली आणि सत्तेमध्ये जागा मिळवली. पुलोद सरकार निर्मिती असो वा महाविकास आघाडीची निर्मिती शरद पवार हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मोठा आणि दीर्घकाळ परिणाम राहिला आहे. असे शरद पवार यांचे महत्त्वाचे आठ निर्णय पाहणार आहोतय
रेड्डी कॉंग्रेसमध्ये झाले सामील
शरद पवार यांनी सहा दशकाहून अधिक काळ राजकारणामध्ये काम केले असून याची सुरुवात त्यांनी 1 मे 1960 रोजी केली. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर, काँग्रेस दोन गटात विभागली गेली. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस. यशवंतरावांसोबत, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये सामील झाले. रेड्डी कॉंग्रेसमध्येही शरद पवार हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.
सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री
जेष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. राज्यामध्ये रेड्डी कॉंग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या कॉंग्रेसच्या युतीचे सरकार होते. यामधून 40 आमदारांच्या पाठिंब्याने शरद पवारांनी राज्यात पुलोद सरकार स्थापन केले. शरद पवारांनी उठाव करुन निर्माण केलेले हे सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला. अनेक वर्षे पुलोद सरकारची जोरदार चर्चा होती. शरद पवारांच्या या राजकीय चालीचा त्यांच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला. त्यांचा या राजकीय चालीला ‘वसंतदाच्या पाठीत खंजीर खुपसला गेला’ असेही म्हटले जात होते.
हे देखील वाचा : राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी
पवारांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी अन् पुन्हा मुख्यमंत्री
इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर आणि राजीव गांधी यांच्या बोलवल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षामध्ये घरवापसी केली. राजीव गांधी ही कॉंग्रेसमधील नवीन युवा पिढी म्हणून ओळखली जात होती. यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाला साथ दिली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
जेव्हा पवार पंतप्रधान होण्याच्या जवळ होते
शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या याच काळात पवारांनी पंतप्रधान होण्याची संधी गमावल्याचे म्हटले जाते. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला, राष्ट्रीय पातळीवर पवारांचे पक्षातील स्थान महत्त्वाचे बनले होते, कारण ते काँग्रेसमध्ये परतले आणि मुख्यमंत्री झाले. १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसमधील नेतृत्वाचा प्रश्न एक प्रमुख मुद्दा बनला. सोनिया गांधी अद्याप राजकारणात आल्या नव्हत्या.काँग्रेसमधील अनेकांना, विशेषतः तरुणांना, पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे असे वाटत होते. पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले, पण मतदानात पी.व्ही. नरसिंह राव यांना जास्त मते मिळाली आणि पवारांची संधी हुकली.
पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात वापसी
६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी अयोध्येत बाबरी मशीद पाडली, ज्यामुळे देशात जातीय तणाव निर्माण झाला. याचा मोठा प्रभाव देशाची अर्थिक राजधानी मुंबईमध्ये तो जास्त जाणवला. मुंबईत दंगली झाल्या आणि देशाची आर्थिक राजधानी आगीत जळून खाक झाली. त्या कठीण काळात, मार्च १९९३ मध्ये, पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुंबई दंगलींच्या पार्श्वभूमीवर हा बदल झाला असला तरी, अनेकांनी त्याचा राजकीय अर्थ लावला आहे. नरसिंह राव यांना दिल्लीत पवारांच्या नावाचा प्रतिस्पर्धी नको होता, म्हणून त्यांनी त्यांना मुंबईत परत पाठवले.
दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या जवळ
१९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्ता गमावलेले शरद पवार १९९६ मध्ये युती राजकारणाचा काळ सुरू झाल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात एक प्रमुख व्यक्ती बनले. नंतर, ते काँग्रेसच्या वतीने लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले. युती राजकारणाच्या या काळात पवार दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीच्या जवळ आले. मात्र सोनिया गांधींशी त्यांचे संबंध ताणले गेले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा एक गट पवारांविरुद्ध काम करत राहिला. सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांचे स्वप्न पुन्हा बिनसले.
हे देखील वाचा : राजकारणातील चाणक्य अन् बहुआयामी व्यक्तीमत्त्व शरद पवारांचा वाढदिवस; जाणून घ्या 12 डिसेंबरचा इतिहास
राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना
शरद पवार यांची पंतप्रधान पदाची संधी गेल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप केला. 1999 मध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचा नवा पक्ष निर्माण केला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापन करत नवीन राजकीय खेळी खेळली. त्यांच्या पक्षाशी विविध पक्षांची युती करत शरद पवार हे नेहमी सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करु लागले. शरद पवार यांचा हा राजकीय स्ट्रोक एक मास्टर स्ट्रोक ठरला. केंद्रामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग राहिला आणि पवार नवीन सरकारमध्ये सामील झाले. पुढील १० वर्षे ते कृषी मंत्री राहिले आहेत.
महाविकास आघाडीची स्थापना
2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सरकार स्थापना बिनसले. देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारुन उद्धव ठाकरे यांना साथ देत शरद पवार यांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अडीच वर्षे राज्यात सत्ता चालवली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार राज्याच्या राजकारणातील नवा प्रयोग ठरला.
राष्ट्रवादी पक्ष हातातून निसटला
शरद पवार यांच्या राजकारणामध्ये आणखी एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे त्यांनीच स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हातातून गेला. शरद पवार यांचा पुतण्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केले. राष्ट्रवादीतील अनेक आमदारांसह त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा माननाऱ्या शरद पवारांनी याला विरोध केला. अजित पवारांनी दावा केल्यानंतर आणि निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार यांच्या हातातून त्यांचा पक्षाचे नाव, चिन्ह गेले. यानंतर देखील शरद पवार हे आजही राजकारणामध्ये सक्रीय असून त्यांचे निर्णय, मत आणि राजकीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते.