
चंद्रपूर काँग्रेसध्ये कोणताही वाद नाही, महापौर बनवण्यासाठी...; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, चंद्रपूरमध्ये २७ नगरसेवकांचा काँग्रेसचा एकत्रित गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु असून, शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्षांनी काँग्रेसबरोबर यावे यासाठीही चर्चा सुरु असून चंद्रपूरमध्येही काँग्रेसचा महापौर बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. परभणी महानगरपालिकेत काँग्रेस शिवसेना (उबाठा) पक्षाला पाठिंबा देत आहे तर चंद्रपुरात त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा यासाठी चर्चा सुरु आहेत.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय व संवादात कोणतीही अडचण नाही व पुढेही अडचण येणार नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.
पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही
भारतीय जनता पक्ष हा जात, धर्म, भाषा, प्रांत याचा राजकारणासाठी वापर करत आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी असे द्वेष पसरवण्याचे काम भाजप करत असते, त्याच मानसिकतेतून मुंबईत बिहार भवन बांधण्याचा घाट घातलेला दिसत आहे. मुंबईत बिहार भवन बांधण्याबरोबरच पाटण्यात महाराष्ट्र भवन बांधण्याचे त्यांनी जाहीर केले असते तर दोन राज्यात सांस्कृतीक आदान प्रदान होत आहे, असे दिसले असते पण भाजपाला फक्त वाद निर्माण करायचे आहेत आणि त्यातूनच बिहार भवनचा मुद्दा पुढे आणला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
बदलापूर घटना गृहविभागाचे अपयश
राज्यात गुंडागर्दी, महिला अत्याचार वाढत आहेत, हे चिंताजनक असून हे गृहविभागाचे अपयश आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. बदलापूरची घटना महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. भाजपा सरकारने अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे पण पोक्सो गुन्ह्यातील आरोपीलाच भाजपा बदलापूरमध्ये स्विकृत नगरसेवक बनवते, यातून लहान मुलींवरील अत्याचाराप्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व भाजपा सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसते, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.