नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. असे असतानाच बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड 10-15 दिवसांत बाहेर येईल, या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया विचारली असता माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे चांगलेच भडकले. ‘हे बघा संजय राऊत काय बोलतात, याच्याशी मला देणे-घेणे नाही’, असे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : या महिन्यात वाजणार महापालिका निवडणुकांचं बिगुल? कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य आकाला वाचवण्याचा प्रयत्न आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला. जेव्हा नारायण राणे यांना विचारले असता ते चांगलेच भडकले. ते म्हणाले, हे बघा संजय राऊत काय बोलतात, याच्याशी मला देणे-घेणे नाही. त्यांना मी नेता-बिता मानत नाही. शिवसेनेत दुसरा कुणी प्रवक्ता नाही. त्यामुळे काम नसलेल्या माणसाला ते बोलायला लावतात. त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही’, अशा शब्दांत राणे यांनी राऊत यांचा समाचार घेतला. शिर्डी येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केला. राज्यात माफियांचे राज्य आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याबाबत विचारल्यावर राणे म्हणाले, शिवसेनेची सत्ता असताना राऊत कोणा-कोणाला पोसत होते. कोणा-कोणाला भेटत होते. राऊत यांना कुठल्या तीर्थयात्रेमुळे तुरुंगाचा पुरस्कार मिळाला, हे त्यांनी सांगावे.
शिंदे हे राजकारणी, नाराज वगैरे नाहीत
एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते कधीच नाराज होऊ शकत नाहीत. कारण, ते राजकारणी आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी चांगले काम केले. भाजपाचे जास्त आमदार निवडून आल्याने आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिंदे नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही.
– नारायण राणे, माजी मंत्री, खासदार, भाजप
बाळासाहेबांनी मिळवले, ते उद्धव यांनी गमावले
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार असल्याच्या प्रश्नावर राणे म्हणाले, ठाकरेंमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाही. बाळासाहेबांनी 46 वर्षांत जे मिळवले, ते उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत गमावले असल्याचा टोलाही लगावला.
संजय राऊतची मानसिकता चांगली नाही
तसेच संजय राऊतची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका. शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होता. कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होता. कोणती तीर्थयात्रा केली म्हणून जेलचा पुरस्कार मिळाला होता. हे त्यांना आधी सांगावं. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे त्याला कामधंदा नसल्याने बोलायला लावतात, अशा शब्दांत नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.