शिवराज मोरेंच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर नवनाथ बन आक्रमक
तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. यानंतर नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली होती.
यावेळी शिवराज मोरेंनी नवनाथ बन यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. आता या सगळ्या वादावर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिवराज मोरे यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर थेट आव्हान दिलं आहे.
नवनाथ बन यांनी म्हटलं की, ‘मी शिवराज मोरेंची पोलखोल केली होती. मुलीवर काही बोललो नाही. त्या ताईबाबत कोणताही अपशब्द वापरला नाही.’
‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
यानंतर त्यांनी शिवराज मोरे यांना काही थेट प्रश्न उपस्थित केले. “ड्रग्ज सापडले होते तर त्याचं काय केलं? संबंधित प्रकरणात कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली? शिवराज मोरेंना फोन आला म्हणून ते मदतीला गेले, मात्र तिथे हाणामारी का झाली? त्या तरुणीची छेड काढणाऱ्याविरोधात कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली? आंदोलन सोडून तिथे जाण्याचं कारण काय?” असे सवाल बन यांनी केले.
नवनाथ बन यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित केला. ‘ड्रग्ज कोणत्या पोलीस स्टेशनला जमा केले की स्वत:जवळच ठेवले?’ असा सवाल त्यांनी केला.
तसंच, ‘तुम्ही कोणती परीक्षा देत आहात?’ असा सवाल करत त्यांनी संबंधित आंदोलनावरही टीका केली. रोहित पवार यांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात इतर लोक असल्याचा दावा करत बन यांनी आंदोलनाच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
शिवराज मोरे यांनी अब्रुनुकसानीचा दावा करण्याचं वक्तव्य केल्यानंतर नवनाथ बन यांनी त्यांना थेट आव्हान दिलं. ‘कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’ ‘माझं आव्हान आहे, 5 हजार कोटींचा दावा करा. कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू,’ असं नवनाथ बन म्हणाले.
यासोबतच त्यांनी सुरू असलेल्या आंदोलनावरही टीका केली. विनाकारण आंदोलन ताणायचं आणि राहुल गांधींना इथे आणायचं, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपद मागायचं, असं सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘नवनाथ बन कोणालाही घाबरत नाही. माझ्या साध्या-सरळ प्रश्नांची उत्तरं द्या,’ असंही बन यांनी ठणकावून सांगितलं.
ड्रग्ज सापडले असतील आणि ते पोलिसांच्या स्वाधीन केले नसतील, तर हा गंभीर प्रकार असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केली.
आता शिवराज मोरे या आव्हानाला काय उत्तर देतात आणि या प्रकरणात पुढे कायदेशीर कारवाई होते का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.






