
NCP party decides not to campaign and hold sabha for Panchayat Samiti elections
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बारामतीमध्ये प्रचारासाठी येत होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या बारामतीमध्ये चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. याच सभांसाठी बारामतीमध्ये येत असताना अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. महापालिका निवडणुकीमधील पराभवाचे नुकसान भरुन काढण्यासाठी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी कंबर कसली होती. मात्र नियतीच्या मनामध्ये काही वेगळेचे होते. अजित पवार यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांसाठी पुणं थांबलं! ‘दादां’च्या जाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना तात्पुरता विराम
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी कोणताही बडेजाव करण्यात येणार नाही. ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील. फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांच्या अपघाती घटनेमुळे फक्त पवार कुटुंब नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
हे देखील वाचा : पुण्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड! माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन
उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत होते. बुधवारी (दि.28) सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या दुर्घटनेत पवारांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबरसह एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला. बारामतीत काल विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर अंतिम संस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.