उपमुख्यमंत्री अजित पवारांचे दुर्दैवी निधन (फोटो- सोशल मीडिया)
पुणे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे तीव्र शोककळा
अजित पवारांचे होते सांस्कृतिक क्षेत्राशी अतूट नाते
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्यासह पुणे शहरातही तीव्र शोककळा पसरली आहे. जनसामान्यांशी तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी अतूट नाते असलेल्या या नेत्याच्या जाण्याने शहरातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनावर मोठा परिणाम झाला असून येत्या काही दिवसांसाठी नियोजित असलेले बहुतांश कार्यक्रम रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत.
शुक्रवार आणि शनिवारी शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, संगीत मैफिली तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दुःखद घटनेनंतर आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. सध्या माघी गणपतीचे वातावरण असून त्यानिमित्ताने शहरातील अनेक भागांत भंडारे व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले होते. मात्र, पुढील दोन दिवसांतील महत्त्वाचे कार्यक्रम रद्द झाल्याने उत्सवी वातावरणावर शोकाची छाया पसरली आहे.
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा रंगल्या होत्या. विविध पॅनल्सकडून आपापली उद्दिष्टे, वचननामा आणि भावी दिशा मांडण्याची तयारी सुरू होती. मात्र दादांच्या निधनानंतर हे सर्व उपक्रम स्थगित करण्यात आले असून, काही दिवसांपासून तापलेले वातावरण अचानक शांत झाले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मागील सोमवारी शहरात उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवस विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रमही रद्द करण्यात आले. या अनिश्चिततेमुळे गुरुवारी शाळा व महाविद्यालये सुरू राहणार की नाही, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसून आली.
अजितदादा पवार यांचा जनमाणसाशी असलेला थेट संवाद, विकासकामांबरोबरच कला-संस्कृतीला दिलेले प्रोत्साहन यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्याविषयी विशेष आपुलकी होती. अनेक कार्यक्रमांना त्यांनी दिलेली उपस्थिती, कलाकारांशी साधलेला संवाद आणि सांस्कृतिक संस्थांना दिलेले पाठबळ आज अनेकांच्या आठवणींमध्ये जागे झाले आहे. त्यामुळेच अनेक आयोजकांनी कार्यक्रम रद्द केल्याचा निर्णय घेतला आहे.






