
ncp sharad pawar live press on maharashtra monsoon and Wet drought political news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा आरक्षणावरील जाहिरातींवर टीका करताना पवार म्हणाले, “सरकारी जाहिराती दिसल्या नाहीत, या खासगी जाहिरातींवर पैसा कुठून आला? देवाभाऊंनी छत्रपतींचा आशीर्वाद मागितला, तो त्यांचा अधिकार आहे. पण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान लक्षात घेतलं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यात सोन्याचा नांगर चालवला, आज मात्र शेतकऱ्यांना संकट भेडसावतंय. याचा विचार मुख्यमंत्री यांनी करायला हवा,” असा सल्ला जेष्ठ नेते शरद पवारांनी दिला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधींच्या आरोपांवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाकडून काही निर्णयांवर विरोधी पक्षाची नाराजी आहे. एकदा माझ्याबरोबर तीनशे खासदार रस्त्यावर उतरले होते. आयोगाने दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या संख्येने खासदार विरोधात गेले, म्हणजे प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसत नाही. आयोगाने विश्वासार्हता वाढवली पाहिजे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
राज्यातील साखर उद्योगासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, “सध्या एकशेएक खासगी व नव्याण्णव सहकारी साखर कारखाने आहेत. त्यापैकी एकशेपस्तीस कारखान्यांनी कामगारांचे सहाशे कोटी रुपये थकवले आहेत. राज्यातील चाळीस टक्के साखर कामगार कंत्राटी आहेत. ‘साखर एके साखर’ हे चित्र परवडणारं नाही. बाय-प्रोडक्टचा विचार केला तरच हा उद्योग टिकेल. इथेनॉल धोरणात नितीन गडकरी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याला विरोध असेल असं मला वाटत नाही,” असेही पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आरक्षण चळवळीबाबत पवार म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिशा दाखवली. प्रश्न सुटावा असं सर्वांना वाटतं. पण समाजातील कटुता कमी होणं गरजेचं आहे. गावागावात संघर्ष आणि वैमनस्य वाढणं महाराष्ट्राला परवडणारे नाही. संवाद साधून वातावरण निर्मळ केलं पाहिजे,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस देशभर उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने “पंच्याहत्तराव्या वर्षी पंतप्रधानांनी थांबायला हवे का?” या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “पंच्याहत्तराव्या वर्षी मी स्वतः थांबलो नाही, त्यामुळे मला बोलायचा नैतिक अधिकार नाही. भाजपामध्ये काही नेते पंच्याहत्तर वर्षांनंतर थांबले, मात्र आता तेच नेते ‘असं कधी बोललो नाही’ असं सांगतात,” अशी टीका त्यांनी केली.