NCP state president Sunil Tatkare's reaction on Dhananjay Munde's reentry into the cabinet
Sunil Tatkare On Dhananjay Munde : रायगड : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व आमदार धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांनी भर मंचावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मंत्रिपदाची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामधील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसोबत असणाऱ्या जवळच्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या. बीडमधील अनेक प्रकरणे प्रकाशझोतात आल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी कामाची आणि पर्यायी मंत्रिमंडळाची पदाची इच्छा बोलून दाखवली आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार धनंजय मुंडे यांनी मंचावरुन थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे कामाची मागणी केली आहे. याबाबत सुनील तटकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ते (धनंजय मुंडे) मला म्हणालेत की काम द्या. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. वेगवेगळे अर्थ घेता येतील त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. कारण त्यांनी राजीनामा दिला त्याची काही कारणं आहेत. न्यायालयीन प्रक्रिया व चोकशी चालू आहे. त्यासंदर्भात आमचे पक्षश्रेष्ठी, महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार एकत्र बसून निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले धनंजय मुंडे?
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनंजय मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त करत कामाची मागणी केली. धनंजय मुंडे म्हणाले की, “मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे. माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, अशी मागणी राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनंजय मुंडे यांनी काम करण्याची संधी ही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत माध्यमांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना याबाबत प्रश्न केला. याबाबत अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांच्या या जाहीरपणे केलेल्या मागणीतून त्यांना मंत्रिमंडळात नवीन आणि मोठी जबाबदारी मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.