
Nitesh Rane on Aditya Thackeray
Nitesh Rane : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे बंधूंकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. मात्र या मोर्चात आदित्य ठाकरे आजारी असल्यामुळे उपस्थित नसल्याचे बोलले जात आहे. यावरूनच मंत्री नितेश राणे यांनी मोठा दावा करत आदित्य ठाकरे विदेशात पळून गेल्याचे सांगितले आहे.
गर्जना मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या मोर्चाची राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली. आता यावरून महायुतीचे नेते हल्लाबोल करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. दिशा सालियान प्रकरणात नाव येत असल्याने आदित्य ठाकरे विदेशात पळून गेल्याचा थेट दावा त्यांनी केला.
नितेश राणे यावेळी म्हणाले, “मला वाटतं म्हणूनच मी वारंवार ही मागणी करत आहे आणि माझी चिंता व्यक्त करत आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात एखाद्या व्यक्तीचे नाव वारंवार समोर येत असेल, तर त्या व्यक्तीची चौकशी करून सत्य परिस्थिती तपासणे ही तपास यंत्रणांची जबाबदारी आहे.” दिशा सालियान प्रकरणाच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं.
पुढे नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या गर्जना मोर्चातील अनुपस्थितीवरूनही भाष्य केलं. ते म्हणाले, “काल आदित्य ठाकरे व्यासपीठावर उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण आजारपण असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यावरून ते देशाबाहेर गेले आहेत किंवा जाण्याच्या तयारीत आहेत, असा निष्कर्ष काढता येणार नाही कदाचित देशाबाहेर गेले सुद्धा असेल त्यांच्या घरी तपासावे.”
नितेश राणे पुढे म्हणाले, “माझी एवढीच मागणी आहे की, जर तपास यंत्रणेला एखाद्या व्यक्तीच्या परदेशात जाण्याबाबत कायदेशीर कारणांमुळे शंका किंवा आवश्यकता वाटत असेल, तर कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या प्रक्रियेचा वापर करावा. लुकआउट नोटीस, पासपोर्ट जप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई ही केवळ आरोपांवर नव्हे, तर ठोस पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारेच झाली पाहिजे. कोणीही कितीही मोठ्या पदावर असो, तपास निष्पक्ष झाला पाहिजे आणि सत्य समोर आले पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे.”
त्यामुळे दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे.