(Photo - X)
MPSC Protest : पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. आंदोलनस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा मागण्या मेनी होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे विद्यार्थी आंदोलकांचे म्हणणे आहे, अश्यातच आता या आंदोलनावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांचं आंदोलन हे ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’ असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली राजकीय आंदोलन सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. नवनाथ बन यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनात MPSC च्या केवळ 20 टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, तर उर्वरित 80 टक्के गर्दी ही राजकीय कार्यकर्त्यांची आहे.
नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर टीका करत हे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला. आंदोलनाला मोजक्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच रोहित पवार यांनी अॅग्रो कंपनीतील कर्मचारी आणि काही कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनाही आंदोलनात सहभागी करून घेतल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला.
नवनाथ बन यांनी आंदोलनस्थळी दिसणाऱ्या वाहनांवरूनही प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अनेक गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
‘जवळपास 200 ते 250 गाड्या बारामतीमधून आल्या आहेत,’ असा आरोप नवनाथ बन यांनी केला. रोहित पवारांनी आंदोलन फ्लॉप होत असल्याचं लक्षात आल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना पुण्यात बोलावून घेतल्याचा दावाही त्यांनी केला. तसंच गर्दी जमवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोपही बन यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
नवनाथ बन यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आंदोलनस्थळी झालेल्या प्रकारावरही भाष्य केलं. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या भाषणानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भाषण केलं. त्यावेळी काही जणांनी त्यांना ‘परत जा’ असं सांगितलं होतं. मात्र, ओमराजेंना विरोध करणारे हे MPSCचे विद्यार्थी नव्हते, तर रोहित पवारांचे कार्यकर्ते होते, असा गंभीर दावा नवनाथ बन यांनी केला आहे.
नवनाथ बन यांच्या या आरोपांमुळे पुण्यातील MPSC आंदोलनाला आता राजकीय रंग चढला आहे. एकीकडे विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना दुसरीकडे आंदोलनातील गर्दी आणि सहभागावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता नवनाथ बन यांच्या आरोपांवर रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.






