बुलडाण्यात काँग्रेस, भाजपमध्ये संघटनात्मक बदल; नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी
बुलढाणा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयकपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे काँग्रेससह भाजपमध्ये संघटनात्मक बदल होताना दिसत आहे. यादरम्यान नवीन चेहऱ्याला संधी दिली जात आहे.
खामगाव मतदारसंघाचे समन्वयक म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीप सानंदा यांनी काँग्रेसच्या राजीनाम्याची बुधवारी (दि. 4) अधिकृत घोषणा केली. त्यापाठोपाठ ही घोषणा करण्यात आली आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयकपदाची जबाबदारी देवानंद पवार यांच्यावर सोपविण्यात आली. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या चिखली मतदारसंघाची जबाबदारी डॉ. राजू गवई यांच्यावर सोपविण्यात आली.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून अशोक पडघान यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून बुलढाणा जिल्ह्यातील शहर व ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदाच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या आहेत. खामगाव ग्रामीणच्या अध्यक्षपदी तेजेंद्रसिंग चव्हाण तर अध्यक्षपदी स्वप्निल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
दरम्यान, अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी मतदान घेण्यात आले होते. मात्र, त्याचा निकाल जाहीर झाला नव्हता. आता विजयराज शिंदे यांची निवड झाल्यानंतर या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार बुलढाणा शहर अध्यक्षपदी मंदार बाहेकर, बुलढाणा ग्रामीण अध्यक्षपदी सतीश भाकरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोताळा शहर अध्यक्षपदी सचिन शेळके तर ग्रामीणपदी सागर पवार, मेहकर तालुका अध्यक्षपदी सारंग माळेकर यांची निवड करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा निवडणुकापूर्वी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या सर्व नवीन निवडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शेजवळ यांची शेगाव ग्रामीण अध्यक्षपदी निवड
कैलास देशमुख यांची शेगाव शहर तर ज्ञानेश्वर शेजवळ यांची शेगाव ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अॅड. भाऊराव भालेराव यांची जळगाव जामोद ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच भाजपमध्येही जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी रखडलेल्या बुलढाणा शहर ग्रामीण मोताळा शहर ग्रामीण व मेहकर तालुक्याच्या अध्यक्षांची नावे जाहीर केली. त्यानंतर जिल्हाध्यक्षांनी शिवालय येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सन्मान करीत त्यांना नियुक्तीपत्र दिले.