शिवाजीपार्क आंदोलनानंतर अभिजीत दिपकेंसह सहकाऱ्यांवर मुंबई पोलिसांत गु्न्हा दाखल
Police Complaint Against Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीच्या शुकवारच्या (2 ऑक्टोबर) शिवाजी पार्कवरील आंदोलनानंतर सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांचा सीजेपीच्या शिवाजीपार्कवरील आंदोलनाला विरोध असतानाही हा विरोध डावलून सीजेपीने इथे आंदोलन केले. पण या आंदोलनानंतर वकील सिद्धी देवळेकर यांनी दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी
हुंकार भरला. दिल्लीत जंतरमंतर प्रमाणे शिवाजीपार्कवरदेखील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आणि अनेक नागरीक जमा झाल्याचे पाहायला मिळाले, इतकेच नव्हे तर, शिवाजीपार्कनंतर सीजेपीने दिल्लीतील आंदोलनाची लवकरच घोषणा करणार असल्याचेही सांगितले आहे.
CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला.
ॲडव्होकेट सिद्धी देवळकर यांच्या तक्रारीनुसार, सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नसतानाही सीजेपीच्या नेत्यांकडून हे आंदोलन करण्यात आल्याने या परिसराची शांतता भंग झाली. असा दावा करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या 2013 मधील एका निवाड्याचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात कोणालाही आंदोलन करण्यास सक्त मनाई आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नसतानाही सीजेपीच्या लोकांनी गर्दी जमा करून निदर्शने केली, असा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.
प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण योग्य ठिकाणी आंदोलने करणे आवश्यक आहे, आझाद मैदानावरही आंदोलन होऊ शकले असते, पण अभिजीत दिपके यांनी शिवाजी पार्कवरच आंदोलन केले. अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात जाऊन आंदोलन करायला हवे होते. त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हवा असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन प्रदर्शन करायला पाहिजे होतं. मुंबईत आंदोलन करण्याला काय अर्थ आहे? असा सवालही सिद्धी देवळकर यांनी तक्रारीत केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देऊन त्यांना काय मिळणार आहे? मी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून त्यांनी ती स्वीकारली आहे. आता ते योग्य ती कारवाई करतील, असही देवळेकर यांनी म्हटलं आहे.






