
पक्ष फोडाफोडीमुळे महायुतीत तणाव
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नगरपरिषदांसह इतर निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग येत आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचे संबंध कमालीचे बिघडल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्षात घेतल्याने शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यातच एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार घातला होता. यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसते. बिहार सरकारच्या शपथविधीवेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना टाळण्याच्या प्रयत्न झाला. शुक्रवारी हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमावेळी समोरासमोर आल्यावर शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना अभिवादन केले आणि दोघेही बाजूला झाल्याचे दिसले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?
दरम्यान, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या शपथविधीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या देहबोलीवरून हे दोन्ही नेते एकमेकांवर नाराज असल्याचे दिसून येत होते. सोहळ्यासाठी दोन्ही नेते वेगवेगळ्या विमानांमधून पाटणा येथे गेले. तर येथून येतानाही वेगवेगळ्या विमानांमधून परतले. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फणडवीस हे एकाच विमानाने बिहारला गेले.
सामंत-फडणवीस यांची गट्टी अधिक घट्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचा जुना दोस्ताना आहे. मात्र, सामंत हे एकनाथ शिंदेंची बाजू सावरण्याचा फक्त ‘आव’ आणत आहेत, असा चिमटा शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी काढला. दावोस दौऱ्यादरम्यान सामंत आणि फडणवीस यांची गट्टी अधिक घट्ट झाली असून, त्याचा थेट परिणाम शिंदे गटाच्या अंतर्गत समीकरणांवर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.