Prahar leader Bachchu Kadu Disqualified from the post of chairman of Amravati District Bank
Bachchu Kadu Disqualified : अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कड़ू हे मागील आठवड्यापासून चर्चेमध्ये आहेत. बच्चू कडू यांनी सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यागांसाठी हे त्यांनी आंदोलन केले. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली. मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतर बच्चू कडू यांना मोठा दणका मिळला आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र करण्यात आलं आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन बच्चू कडू यांना अपात्र करण्यात आले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. बच्चू कडू यांना अन्नत्याग आंदोलन केल्याबद्दल शिक्षा मिळाली असल्याची कुजबुज देखील दबक्या आवाजामध्ये सुरु आहे. बच्चू कडू यांनी त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र केल्याबद्दल भाजपवर नाराजी व्यक्त करुन जोरदार प्रहार केला आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांना अमरावतीच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन काढून टाकल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. माझ्या बँकेतील संचालकांकडून देखील मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही बोलू नका काही अडचणी निर्माण होईल. राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार भेटले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली,. बच्चू कडू यांचं काय मिळतं ते बघा सप्टेंबर पर्यंत बच्चू कडू जेलमध्ये जातील अशी व्यवस्था करा,” असा खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “काहीतरी शोधून काढा तुम्ही तुमच्या लेवलवर आणि प्रशासकीय लेवल वर स्वतः शोधून काढा. बच्चू कडू यांचा बंदोबस्त करता येईल. आता सुरुवात झाली हे आम्हाला अपेक्षित आहे. हे राजकीय दृष्ट्या करतात यात काही नवल नाही. हे सर्व झाल्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर आमची परीक्षा आहे. आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे. या संपूर्ण परीक्षेमधून उजळून आम्ही बाहेर निघू. मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू आहे,” असा गंभीर आरोप प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमांनुसार, जर बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल, तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही. याच नियमाचा आधार घेत बँकेच्या विरोधी गटातील 12 संचालकांनी, ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली, बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती. नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात 2017 मध्ये बच्चू कडू यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 2021 मध्ये नाशिक विशेष न्यायालयाने त्यांना एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती.