
2 डिसेंबरला मतदान झाले तरी निकाल 21 ला लागणार
वडगाव नगरपंचायतीमध्ये झालेल्या मतदानाची आकडेमोड सुरू
उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली
वडगाव मावळ /सतिश गाडे: जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबरला पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबर होणार होती. तशी तयारीही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र अचानक नागपूर खंडपीठाने राज्यातील इतर थांबलेल्या निवडणुका (Maharashtra Local Body Election) घेऊनच एकाहाती निकाल जाहीर करण्यासंदर्भात सर्वच नगरपालिका नगरपंचायत मतमोजणी पुढे ढकलली आहे. यामुळे निकालासाठी 15 दिवस वाट पाहावी लागणार असल्याने आता प्रत्येक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रभागात कुठे साथ तर कुठे दगा मिळण्याची शक्यता आहे, याबाबत आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. झालेल्या मतदानाची आकडेमोड सुरू झाली असून उमेदवारांची धाकधुक चांगलीच वाढत चालली आहे.
मावळ तालुक्यातील लोणावळा तळेगाव दाभाडे वडगाव मावळ 2 नगरपरिषद व 1 नगरपंचायत निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबर रोजी झाले. वडगाव मावळमध्ये सर्वाधिक 73.83 टक्के मतदान झाले आहे. एकूण 14 हजार 554 मतदारांपैकी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढीस लागले आहे.
वडगावात नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरूद्ध भाजप शिवसेना महायुती अशी प्रमुख चुरशीच्या लढती झाल्या आहेत. तर नगरसेवक पदांसाठीही काँटेकी टक्कर ठिकठिकाणच्या प्रभागांमध्ये झाल्या आहेत.
वडगावात नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांची मोठी गर्दी; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
या निवडणुकीत 15 ते 20 हजारांचा मताला भाव देऊन मत खरेदी केले असल्याने अनेक प्रभागात कार्यकर्त्यांनी विजयाची तयारी ही केली या 15 दिवसात उमेदवारीची आकडेवारी मोजण्याला सुरुवात झाली असून कुठून पाठींबा मिळाला तर कुठे आपल्याला दगाफटका झाला, या बाबत आत्मपरीक्षण सुरू झाले असून अनेक भागात काय परिस्थिती होती याची विचारणा करताना कार्यकर्ते व उमेदवार दिसत आहेत.
मतदानाची अंतिम आकडेवारी हाती येताच उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जात आहे. मागील नगरपंचायत निवडणुकीतील मतदान आणि यावेळी झालेले मतदान याचे विश्लेषण केले जाते आहे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका टाळून ही निवडणूक लढविली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडे गेलेली मते यावेळी आपल्याला मिळणार असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, तर काही ठिकाणी निवडणूक ही एकतर्फी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी आताच विजयोत्सवाची तयारी सुरु केलेली दिसून येते आहे.
वडगाव नगरपंचायत निवडणूक ही केवळ उमेदवारांसाठी महत्वाचाही नाही तर या वडगाव शहरातून विधानसभेला राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालेले आहे. मागील वर्षी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असल्याने वडगाव शहरातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आमदार सुनील शेळके धडपड सुरू होती, तर भाजपकडून माजी सभापती गुलाब म्हाळसकर यांची कन्या मृणाल म्हाळसकर रिंगणात उतरवल्याने नेतेगणांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता प्रतीक्षा 21 डिसेंबरची असून कोण सिद्ध करणार वर्चस्व याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीमुळे नगरपंचायत निवडणुका चुरशीच्या होत आहेत. नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली जात आहे. काही करून नगरपंचायतीवर आपला नगराध्यक्ष बसवायचा असा निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षांनी ही निवडणूक लढविली असल्याने प्रत्येकाकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.