
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची ‘सस्पेन्स’ अखेर संपली
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे या पदासाठी सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून आदिती तटकरे यांचे नाव चर्चेत होते. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावले यांच्याकडूनही या पदासाठी दावा करण्यात आला होता. दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असल्याने या नियुक्तीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
विशेष म्हणजे, 15 ऑगस्ट रोजी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांना मिळाला होता. त्यावेळी त्यांच्या वक्तव्यामधून रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काही संकेत मिळाले होते. आता त्यांच्या नियुक्तीने त्या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. गोगावले सध्या दिल्ली दौऱ्यावर असून पर्यटन विभागाशी संबंधित कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. ते रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे.
मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचाही तिढा आता सुटला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. कुंभमेळ्याशी संबंधित मोठी जबाबदारी यापूर्वीच गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता पालकमंत्री म्हणूनही त्यांच्यावर नाशिकच्या प्रशासन आणि विकासाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत.
रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीतील दोन्ही घटकांमधील राजकीय समतोल साधत हे निर्णय घेण्यात आल्याचे चित्र आहे.