
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घडामोडींवर भाष्य केले आहे. तरुणांच्या आंदोलनामुळेच केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली, असा दावा करत त्यांनी एका वाक्यात, “या जेन झीनी सरकारच्या झिंज्या उपटल्या,” अशी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे म्हणाले की, “भाजप विरोधी पक्षात असताना रेल्वे अपघात घडल्यास रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असे. मात्र, नीट पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणानंतरही शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नव्हता. त्यामुळे देशभरातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागला,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी तरुणांच्या एकजुटीचे कौतुक करत हा संपूर्ण देशातील युवकांचा विजय असल्याचे सांगितले. आंदोलनामुळे सरकारला आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा लागला आणि युवकांच्या आवाजाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली, असेही ते म्हणाले. तरुणांचा राग आता केवळ शिक्षणमंत्र्यांपुरता मर्यादित राहिला नसून तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला असल्याचाही दावा त्यांनी केला.
या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शिवाजी पार्क येथे विशेष अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली. वीर सावरकर मार्गावरील व्यासपीठावर देशभरातील तरुणांनी एकत्र यावे आणि लोकशाही मार्गाने मिळालेल्या या यशाचा जल्लोष करावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरे यांनी यावेळी नीट पेपरफुटीच्या प्रश्नावर पूर्वीच इशारा दिल्याचा दावाही केला. 2016-17 च्या सुमारास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून पेपरफुटीच्या घटनांमुळे भविष्यात विद्यार्थी आत्महत्या करण्याची भीती व्यक्त केली होती, असे त्यांनी सांगितले. दुर्दैवाने आज तीच परिस्थिती देशासमोर उभी राहिली असून शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आंदोलनाच्या नेतृत्वाचा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी अभिजित दीपकेंचे विशेष कौतुक केले. या आंदोलनाची सुरुवात करण्यापासून ते देशभरातील युवकांना एकत्र आणण्यापर्यंत दीपकेंची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे अभिजित दीपके जो निर्णय घेतील, त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी चालना मिळाली आहे.