भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचं नाव 'फिक्ड'; आज होणार अधिकृत घोषणा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याची चर्चा सुरु होती. त्यानुसार, अनेक नावं समोरही आली होती. मात्र, आता महाराष्ट्रातील भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. माजी मंत्री आणि डोंबिवलीचे चार वेळा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यातील अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. त्यातच आता आज त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मंगळवारी संध्याकाळी चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. ही निवड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या निवडीचे समर्थन करताना त्यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. त्यानंतर ते नगरसेवक, आमदार आणि मंत्री झाले. त्यांनी नेहमीच पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : ठाकरेंना मोठा धक्का! कोल्हापूरमध्ये शिवसेनेत अंतर्गत कलह; उपनेते संजय पवार यांनी थेट दिला राजीनामा
दरम्यान, चव्हाण यांनी २००९ पासून डोंबिवली मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. याशिवाय, त्यांनी महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार फायदा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, भाजपने रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या मराठा समाजातील प्रभावी नेत्याला पुढे आणून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे मराठा समाजाला एक सकारात्मक संदेश जाईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाला वाटत आहे.
बावनकुळे यांच्याकडे सध्या पदभार
सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानामध्ये उतरुन बावनकुळे यांनी सक्रीय राजकारणात पुन्हा एकदा प्रवेश केला. त्यानुसार, त्यांना मंत्रिपदही देण्यात आले. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. या पदासाठी आत्तापर्यंत अनेक नावे पुढे आली आहेत. यामधून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. इतकेच नाहीतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याच्याही चर्चा होत्या. पण, आता याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : “राज्याचं आर्थिक संतुलन ढासळलं आहे…; जयंत पाटील यांचा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घणाघात