Abhijeet Dipke AI Surveillance : "अमेरिकन एआय कंपनीद्वारे माझ्यावर पाळत!"; CJP अध्यक्ष अभिजीत दीपके यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
दीपके यांनी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर करत सांगितले की, भारत मंडपम येथे आयोजित ‘फ्युचर क्राइम समिट २०२६’मध्ये ‘री सिक्युरिटी’ने आपल्या एआय टूलचे प्रात्यक्षिक सादर केले. या सादरीकरणादरम्यान स्क्रीनवर त्यांच्या संदभर्भातील माहिती दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
समिटला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही बाब दीपके यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेऊन नागरिकांवर पाळत ठेवत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“माझी सर्व माहिती AI टूलमध्ये सादर करण्यासाठी या कंपनीला परवानगी कोणी दिली? वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सर्व चालले आहे. सरकार नक्की कोणाला मदत करत आहे?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला आहे.
परदेशी कंपनीच्या मदतीने भारतीय नागरिकांवर नजर ठेवली जात असेल, तर तो गोपनीयतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गंभीर प्रश्न असल्याचे दीपके म्हणाले, त्यांनी सोशल मीडिया कंपन्यांनाही आवाहन करत, कोणत्याही सरकारच्या दबावाखाली येऊन नागरिकांचा आवाज दाबू नये, असे म्हटले. अल्गोरिदमचा वापर केवळ बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह मजकूर रोखण्यासाठी व्हावा, मतभिन्नता दडपण्यासाठी नव्हे, असे त्यानी स्पष्ट केले.
AI टूलच्या प्रात्यक्षिकादरम्यान त्यांच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती स्क्रीनवर दाखवण्यात आली. मात्र, ही माहिती संबंधित कंपनीकडे कशी पोहोचली आणि ती प्रदर्शित करण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचा तसेच AI तंत्रज्ञानाच्या वापराचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मात्र, संबंधित अमेरिकन AI स्टार्टअप किंवा सरकारकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.






