Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?
Abhijeet Dipke News: राज्यासह संपूर्ण देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर दीपके छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत. आंदोलनादरम्यान, त्यांना टायफॉईडचे निदान झाल्यामुळे ते सध्या संभाजीनगर येथील राहत्या घरीच आहेत. त्याचबरोबक सीजेपीच्या आगामी रणनीतीबाबत बैठका सुरू असून, दीपके यांची भेट घेण्यासाठी नेते तसेच सर्वसामान्य नागरिक त्यांच्या निवासस्थानी येत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी अभिजीत दीपके आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याला भेटायला येणाऱ्या नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी पोलिस उद्धटपणे वागत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. यावेळी अभिजीत दिपके यांनी पोलिसांवर संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याला जाबही विचारला.
या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षणा तात्काळ काढून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अभिजीत दीपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच, कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर अभिजीत दीपके यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पण आपल्याला भेटायला येणाऱ्या नागरिकांना आपली भेट घेण्यापासून पोलीस रोखत असल्याचा
नागरिकांना आपली भेट घेण्यापासून पोलीस रोखत असल्याचा आणि त्यांच्याशी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप दीपके यांनी केला होता. यावेळी त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला थेट जाब विचारला.
“मी कोणाला भेटायचं हे पोलिसांनी मला सांगायचं नाही. मी कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हे मी ठरवणार,” अशा शब्दांत दीपके यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, “तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात? तुमचे पद काय आहे?” अशी विचारणाही त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला केली होती.
नागरिक आपल्याला भेटण्यासाठी येत असताना पोलीस त्यात हस्तक्षेप करत असल्याचा संताप व्यक्त करत दीपके यांनी संबंधित अधिकाऱ्याला “तुम्ही बाहेर जा,” असे सांगितल्याचाही दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने दीपके यांच्या पोलीस संरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






