Money squandering in Anand Ashram
ठाणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. यामध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत होणार आहे. राज्यामध्ये बंडखोरीचं राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा असल्यामुळे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात पैशांची उधळण केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर आनंद आश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तसेच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आनंद आश्रमामध्ये पैशांची उधळण करत असलेले लोक शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. आश्रमात पैसे उडविणारे शिवसैनिक बारमध्ये जाणार होते, म्हणूनच त्यांनी त्यापद्धतीप्रमाणे पैसे उधळले, असा आरोप उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली. स्व. आनंद दिघेंनी त्याकाळी बार फोडून सामान्य माणसाला न्याय दिला होता. पण त्याच दिघे साहेबांच्या आश्रमात बारप्रमाणे पैसे उडविले जाणे, हा दिघे साहेबांचाच अवमान आहे, अशी घणाघाती टीका वैभव नाईक यांनी केली.
हंटर उतरला असता आणि एकेएकाला फोडले असते
या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी देखील गंभीर टीका करत शिंदे गटाला खडेबोल सुनावले आहेत. संजय राऊत म्हणाले की, स्व. आनंद दिघेंच्या घरात भिंतीवर एक हंटर लावलेला होता. काल आनंद आश्रमात झालेला धिंगाणा आनंद दिघेंनी पाहिला असता तर भिंतीवरील हंटर काढून त्यांनी लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढलं असतं. जे स्वतःला आनंद दिघेंचा वारसादार मानतात, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, हा आनंद दिघेंचा वारसा नाही. आनंद दिघे अशाप्रकारच्या लोकांचे कधीच समर्थन करत नसत. बारमध्ये ज्या प्रकारे पैसे उधळावेत, त्या पद्धतीने आनंद आश्रमात पैसे उधळले गेले. आनंद दिघेंना यांनी गुरू मानले असले तरी दिघेंनी यांना आपले शिष्य मानले होते का? बारमध्ये पैसे उधळावेत, अशा प्रकारचे कृत्य आनंद दिघेंच्या आसनासमोर झाले. स्वतःला आनंद दिघेंचे चेले म्हणवून घेणाऱ्यांनी यावर भाष्य केले पाहीजे. दिघे साहेब असते तर भिंतीवचा हंटर आज नक्कीच खाली उतरला असता आणि एकेएकाला फोडून काढले असते, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….
दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले…
आमचा आनंद हरपला ! @TV9Marathi @saamTVnews @zee24taasnews @abpmajhatv @lokmat @SaamanaOnline pic.twitter.com/C5xKkoaTvk— Kedar Dighe (@MiKedarDighe) September 13, 2024
आनंद हरपला…!
त्याचबरोबर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी देखील सोशल मीडियावर याच्या व्हिडिओ शेअर केल्या आहेत. संबंधित व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या …. दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले… आमचा आनंद हरपला ! असे म्हणत केदार दिघे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर देखील याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी उत्तर द्यावीत असे नेटकऱ्यांचे देखील म्हणणे आहे.