पक्षचिन्ह की आघाडी साताऱ्याच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष
सातारा : राज्यातील 224 नगरपालिकांच्या फेर प्रभाग रचनेचे आदेश जाहीर झाल्यापासून सातारा शहरामध्ये राजकीय समीकरणांची फेरमांडणी सुरू झाली आहे. यंदाची पालिका निवडणूक ही खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी व बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीत होणार की भाजपच्या कमळ चिन्हावर लढली जाणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. म्हणून मनोमिलनाचा तिसरा पर्याय सुद्धा आजमावला जाण्याची शक्यता आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्यास बंडखोरीचा वनवा पेटण्याची शक्यता आहे.
2016 च्या पालिका निवडणुकीमध्ये उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने 22 व शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीने 12 जागा तर भारतीय जनता पार्टीने 6 जागा निवडून आणल्या होत्या. साताऱ्यामध्ये आघाडी आणि भारतीय जनता पार्टी हे दोन स्वतंत्र विषय आहेत. मात्र, 2022 च्या राज्यातील सत्ता पालट नाट्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना ‘जादूची झप्पी’ देत सर्व राजकीय मतभेद मिटवले होते.
दरम्यान, गेल्या 2 वर्षांत दोन्ही नेते एकमेकांशी जुळवून घेत आहेत. त्यामुळे सातारा पालिकेच्या निवडणुकांचा पेच पुन्हा वाढला आहे. मनोमिलन की समोरासमोर लढती या विषयावर सध्या चर्चा सुरू आहेत.
साताऱ्यात राजे घेतील तो निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या एका सभेमध्ये उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्राचे कॅप्टन ठरवून टाकले. आता राज्यस्तरीय रचनेमध्ये उदयनराजे भोसले यांचा राजकीय रस जितका आहे. त्यापेक्षा कित्येक पट स्थानिक राजकीय समीकरणे जुळवण्यात त्यांचे स्वारस्य जास्त आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुका सातारा जिल्हा बँक तसेच सातारा विधानसभा मतदारसंघावर आपली राजकीय पकड कायम ठेवली आहे. मात्र, सातारा पालिकेमध्ये दोन्ही नेत्यांचा एक अलिखित करार आहे. या अलखित कराराचे पुनर्जीवन होणार की समोरासमोर मैत्रीपूर्ण लढती होणार या चर्चा वेळीच होणे क्रमप्राप्त आहे, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी साताऱ्यात दोन्ही राज्यात निर्णय घेतील असा हिरवा कंदील ही देऊन टाकला आहे.
पुन्हा एकदा मनोमिलनाची चर्चा
अदालतवाड्याच्या साक्षीने साताऱ्याच्या दोन्ही राजांनी 2007 मध्ये आपले राजकीय मतभेद मिटवत म्हणून मिलनाची सत्ता साताऱ्यात आणली होती. त्यानंतर पुढील 10 वर्षे हे मनोमिलन सातारा पालिकेत टिकून होते. 2016 च्या निवडणुकीत दोन्ही आघाड्या पुन्हा एकदा समोरासमोर लढल्या होत्या. आता खासदार उदयनराजे भोसले व बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अद्याप मनोमिलन की आघाडी या विषयावर आपले राजकीय मतभेद जाहीर केले नाहीत. त्यामुळे सातारा पालिकेत काय राजकीय समीकरणे दिसणार याची साताऱ्यात उत्सुकता आहे.