
satej patil
मुंबई : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेले काँग्रेस नेते सतेज पाटील यांना आता पक्षाने आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीत त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही बंटी पाटील काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रीनिंग कमिटी स्थापन केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी 16 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी केले.
या समितीच्या अध्यक्षपदी के. जे. जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सतेज पाटील आणि खासदार शफी परंबिल यांना सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी या स्क्रीनिंग कमिटीकडे असणार आहे. उमेदवारांची लोकप्रियता, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क, पक्ष संघटनेतील काम आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता अशा विविध बाबींचा विचार करून समिती उमेदवारांची छाननी करणार आहे.
गोवा हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असून सध्या तिथे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला मजबूत आव्हान उभं करायचं आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरचे सतेज पाटील यांच्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास महत्त्वाचा मानला जात आहे.
अलीकडेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 25 पैकी 13 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. मात्र, चेअरमन निवडीच्या प्रक्रियेत शासकीय सदस्यांच्या नियुक्तीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. या निर्णयाविरोधात बंटी पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनही केलं होतं. या घडामोडींनंतर आता काँग्रेसने त्यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीबद्दल सतेज पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. गोव्यातील स्थानिक कार्यकर्त्यांशी समन्वय साधून जनतेशी जोडलेले आणि सक्षम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता गोव्याच्या निवडणुकीत बंटी पाटील काँग्रेससाठी किती प्रभावी रणनीती आखतात, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
Ans: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्थापन केलेल्या स्क्रीनिंग कमिटीत सतेज पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
Ans: काँग्रेसने के. जे. जॉर्ज यांची या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सतेज पाटील आणि खासदार शफी परंबिल हे सदस्य आहेत.
Ans: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची छाननी करणे, त्यांची राजकीय क्षमता, जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि निवडून येण्याची शक्यता तपासणे, ही स्क्रीनिंग कमिटीची प्रमुख कामे आहेत.