भारतात 'प्रायव्हेट जेट'चा व्यवसाय किती मोठा? (photo Credit- X)
अजित पवार हे मुंबईहून बारामतीसाठी ‘लियरजेट-४५’ (Learjet-45) या खासगी विमानाने रवाना झाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला. प्राथमिक अहवालानुसार, लँडिंगच्या वेळी वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसली नाही, ज्यामुळे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. या घटनेनंतर विमानाने पेट घेतला, ज्यामध्ये मोठी हानी झाली.
गेल्या काही वर्षांत भारतात कॉर्पोरेट आणि राजकीय कारणांसाठी खासगी विमानांचा वापर वेगाने वाढला आहे. ‘इंडल्झ ग्लोबल’ आणि ‘एसबीएस एव्हिएशन’च्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या १६८ खासगी जेट आहेत. २०१६ मध्ये ही संख्या ११४ होती, म्हणजेच दरवर्षी सरासरी ७ नवीन विमाने भारतात येत आहेत. खासगी आणि भाड्याने मिळणारी (चार्टर्ड) विमाने मिळून ही संख्या ४०० च्या पार गेली आहे. २०२४ मध्ये भारताचा चार्टर्ड प्लेन व्यवसाय २५ अब्ज रुपयांवर (२७४ दशलक्ष डॉलर्स) पोहोचला असून, २०२९ पर्यंत तो दुप्पट होण्याची चिन्हे आहेत. एका खासगी विमानाचे भाडे सरासरी ३ लाख रुपये प्रति तास इतके असते.
खासगी विमान उडवणे ही केवळ श्रीमंती नसून ती एक जटिल तांत्रिक प्रक्रिया आहे. यासाठी खालील नियमांचे पालन करावे लागते:
DGCA ची कडक नजर: भारतात कोणतेही खासगी विमान उडवण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यांच्या परवान्याशिवाय एकही विमान हवेत झेपावू शकत नाही.
टॅक्स आणि सवलती: खासगी विमानांना कोणत्याही प्रकारची सरकारी कर सवलत मिळत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानुसार, ही विमाने सार्वजनिक सेवेसाठी नसल्याने त्यांना सर्व व्यावसायिक टॅक्स भरावे लागतात.
देखभाल आणि पार्किंग: विमानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी CAR-M आणि CAR-145 या नियमांतर्गत त्यांची नियमित तपासणी केली जाते. विमानतळावर पार्किंगसाठी मालकांना मोठी रक्कम मोजावी लागते.
ATC आणि रूटमॅप: उड्डाणापूर्वी वैमानिकाला एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला आपला पूर्ण प्रवास मार्ग (Route Map) द्यावा लागतो. हवेतील गर्दी आणि हवामान पाहून एटीसी परवानगी देते.
अनुभवी वैमानिक: खासगी जेटसाठी विशेष परवाना असलेले अनुभवी वैमानिकच नियुक्त केले जातात. त्यांच्या आरोग्याची आणि कौशल्याची नियमित तपासणी डीजीसीएद्वारे केली जाते.






