Shinde group leader Shahajibapu Patil replied to Kunal Kamra through poetry
मुंबई : राज्यामध्ये मागील आठवड्यापासून विडंबनात्मक कविता गायल्या जात आहे. याचे कारण म्हणजे कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गायलेली कविता आहे. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर आणि राजकारणावर विडंबनात्मक कविता गायली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून कामराची पाठराखण तर शिंदे गटाच्या नेत्यांकडून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे.
कुणाल कामरा याला सध्या राज्य सरकारकडून सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात रोष वाढत चालल्यामुळे त्याने सुरक्षेची मागणी केली होती. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण रंगले आहे. कुणाल कामरा याचा स्टुडिओ फोडण्यात आला असून स्टुडिओ असलेल्या हॉटेलवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शिंदे गटाचे नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. आता शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी खास कविता सादर केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील हे त्यांच्या काय झाडी…काय डोंगर…या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आले होते. आता शहाजीबापू यांनी कुणाल कामरा याच्या टीकेला कवितेमधून उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया, उद्धवजी को खुशी आया लेकीन ठाणे का टायगर आखो मे अंगार उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया,’ अशा शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी टोला लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील यांनी कुणाल कामरामुळे राज्यातील जनता दुखावली गेली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “कुणाल कामराच्या या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेचं मन दुखावले आहे. त्यामुळे कुणाल कामरा याच्या विरोधात सांगोल येथे तक्रार दाखल करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा कायदा पारित व्हावा यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे,” असे मत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर राज्यामध्ये नवीन महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र यामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही. याबाबत शिंदे गटाचे नेते शहाजीबापू म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून निधी मिळवून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, निवडणूक काळात शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं वचन पूर्ण करावं, आपली फसवणूक झाली अशी भावना शेतकऱ्यांची होऊ नये. अर्थमंत्री अजित पवार हे कधीही खोटं बोलत नाहीत, त्यामुळे त्यांनी तिजोरीची वास्तवता सांगितली आहे तरीही त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवावी. त्याचबरोबर केंद्रातून निधी आणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणाही लवकरात लवकर करावी,” अशी मागणी शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.