
'...अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
मुंबई : आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी शिकवू पाहणारे विरोधक स्वतः मात्र सत्तेसाठी संधीसाधूपणा, दुटप्पीपणाचा कळस करत अंबरनाथमध्ये भाजपशी हातमिळवणी केली, तेव्हा काँग्रेसची नैतिकता कुठे गेली होती, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. स्वतःच्या अभद्र युतीचे स्पष्टीकरण द्यावे आणि मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे, असा हल्लाबोलही शिंदे यांनी केला.
सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पण त्याआधी राज्यात झालेल्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी केल्याचे समोर आले. त्यानंतर काँग्रेसने निलंबित केलेल्या नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आहे. या प्रकरणावर शिंदे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात परखड भाष्य केले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
ते म्हणाले की, ही युती महायुतीच्या विचारधारेच्या विरुद्ध होती. यावर भाजपच्या वरिष्ठांकडे मी विचारणा केली आहे. मी आधी त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोललो. ही युती आपल्या विचारविरोधात असल्याचे सांगितल्यावर त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले.
अंबरनाथमधील घडामोडी अशा…
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेने २६ जागा जिंकल्या होत्या. भाजपने १४ जागांवर विजय मिळवला होता. पण, शिंदेसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजपने खेळी केली. काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेत त्यांनी अंबरनाथ विकास आघाडी काढली. यात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४ आणि १ पक्ष अशा ३१ नगरसेवकांचा समावेश होता.
काँग्रेसच्या नगरसेवकांना ‘तो’ निर्णय महागात
काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना भाजपसोबत जाण्याचा निर्णय महागात पडला. काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह निलंबित १२ नगरसेवकांनी प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
हेदेखील वाचा : Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ