
शिवसेनेची विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; तीन कॅबिनेट मंत्र्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना विभागीय जिल्हा संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केल्याचे निवेदन पक्षाने जारी केले आहे. उत्तर कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी मंत्री भरत गोगावले यांची तर सह संपर्कप्रमुख पदी प्रदीप खाडे यांची नियुक्ती केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दगडू सकपाळ यांच्यावर तर सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी हनुमंत जगदाळे यांच्यावर सोपवली आहे. दक्षिण कोकण विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख पदी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकरिता विभागीय संपर्क प्रमुख म्हणून माजी मंत्री दिपक सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हांकरिता विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्कप्रमुख तर पराग पिंगळे यांची विभागीय सह संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे शिवसेनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या घोषणेनुसार, भरत गोगावले यांची उत्तर कोकण विभागीय संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दगडू सकपाळ यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विभागीय संपर्कप्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पक्षाचे धोरण, कार्यक्रम आणि निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवणे, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे तसेच संघटनात्मक कामकाजावर लक्ष ठेवणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते. या नियुक्त्यांमुळे आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच, राज्यभरात पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.