
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिवसेनेचा दिवाळीचा गोडवा! राज्यात ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधांचे वितरण
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठवाडा, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर भागातील २७८ तालुक्यांमधील शेतकरी कुटुबियांना दिवाळी किट्स देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (Anand Paranjpe)
परांजपे म्हणाले की, १९७२ नंतर महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी केली होती, त्यानंतर राज्यात केंद्रीय पथकं आली आणि दुष्काळाची पाहणी करुन गेली, असे परांजपे म्हणाले. दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली होती.
शिवसेनेने आतापर्यंत मराठवाड्यात १ लाख ७७ हजार, नाशिक विभागात १ लाख ३५ हजार, पुणे विभागात ८२ हजार, अमरावती विभागात ७७,५००, नागपूर ६६ हजार दिवाळी शिधा किट्स वितरित केले. तसेच १० हजार उसतोड कामगारांनाही दिवाळी शिधाचे किट्स दिल्याचे परांजपे म्हणाले. कोकणात शेवटच्या टप्प्यात दिवाळी शिधाचे किट्स वितरित होतील, अशी माहिती परांजपे यांनी दिली.
राज्य सरकारने ३५८ तालुक्यांपैकी ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यातील २७८ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना शिवसेनेने दिवाळी शिधा दिला. राज्यात जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा शिवसेना आणि एकनाथ शिंदे सर्वात आधी धावून जातात, असे समीकरण आहे. दसऱ्याच्या दिवशी ठाण्यातून ६० ट्रक आणि मुंबईतून ४० ट्रक दिवाळी शिधा रवाना केला होता. आतापर्यंत एकूण ५ लाख ३८ हजार ५०० दिवाळी शिधा किट्स शेतकऱ्यांना देण्यात आले. शिवसेना डॉक्टर सेलच्या माध्यमातून गरिबांना ५००० दिवाळी शिधा दिला जाणार आहे, असे परांजपे म्हणाले.
यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करायची, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या सर्व मंत्री, आमदार, खासदार यांना दिले. शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात शेतकऱ्यांच्या पत्नींना, माता भगिनींना २५ हजार शिलाई मशीन आणि मुलींना २५ हजार सायकलींचे वितरण पक्षाकडून करण्यात आले. ‘मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण’, भगवा घेऊन खांद्यावर शिवसैनिक शेतकऱ्याच्या बांधावर, अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुलीच्या विवाहाची चिंता करु नये, डिसेंबर महिन्यानंतर शिवसेनेकडून सामूदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातील, याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा प्रमुखांकडे नोंदणी करावी, असे परांजपे म्हणाले. दुष्काळग्रस्त भागातील शिवसेनेच्या शाखा या शेतकरी सेवा केंद्र म्हणून काम करतील. यातून शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती, मनरेगा नोंदणी, पंचनाम्यातील अडचणी सोडवल्या जातील.
ते पुढे म्हणाले की, बुधवारी शिंदे यांना काशी नगरीत सनातन मार्तंड आणि धर्मध्वजाधारक या पदवींनी सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या कामे होत नाहीत, या तक्रारीवर परांजपे म्हणाले की शिंदे हे महायुतीच्या २३२ आमदारांची कामे करतातच पण विरोधकांचीही कामे करतात. त्यामुळे कामाच्या बाबतीत राष्ट्रवादीचा कुठलाही आमदार उपमुख्यमंत्री शिंदे यांना केव्हाही भेटू शकतो, असे परांजपे म्हणाले.
ठाण्यातील पूर्णेकर हत्याप्रकरणी परांजपे म्हणाले की, पहिल्या दिवसापासून विरोधकांनी पूर्णेकर कुटुंबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. पूर्णेकरांच्या कुटुबियांसाठी ठाण्यात येणाऱ्या विरोधकांनी दिशा सालियनच्या कुटुंबियांची भेट घेण्याचे धारिष्ट का दाखवले नाही, अशी टीका परांजपे यांनी केली. दिशा सालियन प्रकरणी शिवसेनेच्या खासदारांचे शिष्टमंडळ सीबीआयच्या प्रमुखांची भेट घेईल, असे परांजपे म्हणाले.
केवळ दिवाळीपुरता नाही तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचे उपक्रम राबवले जातील.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत. सीएम असताना कॉमन मॅन म्हणून शिंदे यांनी काम केले. त्यानंतर डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम केले. आता दुष्काळी संकटात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शिंदे साहेब डेडिकेटेड टू चेंज मेकर ठरले असल्याचे परांजपे म्हणाले.