'कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना हा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष, भूमिका निर्णायक राहणार'; मंत्री प्रकाश आबिटकर यांचं विधान
कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे निक्षून सांगितले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला दावा अधिक भक्कम केल्याचे बोलले जात आहे. शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या जिद्दीने मोठं संघटन उभं राहिले असल्याचं त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका निर्णायक राहील, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष असल्याचे म्हटल्यानंतर चंद्रदीप नरके यांनी देखील आबिटकर यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याचे स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या दहा आमदारांमध्ये शिवसेनेचे पाच आमदार असल्याचा उल्लेख माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला. कोल्हापुरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
आबिटकर यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी सहा आमदार, दोन खासदार शिवसेनेचे असताना कसाबसा मी एकटा निवडून आलो होतो. त्यानंतरच्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सुजीत मिणचेकरांचे काय अवस्था होती, यात हे काही कळायला साधन नव्हतं. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच या जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना समोर आला असल्याचे प्रकाश आबिटकर म्हणाले. आता पाच आमदार शिवसेनेचे आणि एक माजी आमदार, खासदार सुद्धा शिवसेनेचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचा असल्याचे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: राजकारणात ट्विस्ट! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांचे सूचक वक्तव्य
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी दररोज एका लोकप्रतिनिधीने उपस्थित राहावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं.
श्रीकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हातकणंगले खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर, करवीरचे आमदार चंद्रजीत नरके, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे याचा मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले.