धंनजय मुंडे पुन्हा मंत्री होण्याची शक्यता (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. धनंजय मुंडे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याबाबत असे संकेत दिले आहेत. कृषी विभागाने केलॆल्या आरोपांमध्ये न्यायालयाने धनंजय मुंडे यांना क्लीनचीट दिल्यानंतर मुंडे पुन्हा एकदा मंत्री होण्याची शक्यता आहे. त्यातच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराड प्रकरण आणि कृषी विभागाने केलेल्या आरोपांमुळे जोरदार टीका झाली होती. दरम्यान त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता कृषी विभागाने केलेल्या आरोपांमधून कोर्टाने त्यांना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे मुंडे पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी याबाबत भाष्य केले आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
कृषी घोटाळ्यात ज्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले त्यानंतर त्यांना क्लिनचिट मिळाली. त्याच्याबद्दल दुसरी चौकशी सुरु आहे, या चौकशीत त्यांना निर्दोष ठरवले तर त्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिली जाईल.
बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता. त्यानंतर प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता त्यांना कृषी विभागाच्या प्रकरणात क्लीनचीट मिळाली आहे. दुसऱ्या प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यास त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.
मुंडे मंत्री झाल्यास कोणाचा पत्ता कट होणार?
धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्री होण्याची शक्यता आहे. मात्र ते मंत्री होणार असल्यास कोणाचा पत्ता कट होणार हे पाहावे लागणार आहे. मुंडे यांच्या जागी छान भुजबळ मंत्री झाले आहेत. मात्र सध्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील कोकाटेंबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे. त्यामुळे येत्या दोन ते चार दिवसांत कोकाटेंच्या मंत्रिपदाचा फैसला होण्याची षक्यता आहे. जर त्यानं राजीनामा द्यावा लागला तर कृषिमंत्रीपदाची माळ मुंडेंच्या गळ्यात पडणार का? की मंत्रिमंडळात काही फेररबदल होणार हे पाहावे आवश्यक असणार आहे.