खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाची साताऱ्यात होळी; शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
सातारा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे शिंदे शिवसेना गटाच्या वतीने दहन करण्यात आले. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवतीर्थावर राऊत यांच्या पुस्तकाचे दहन करत तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत हे सुपारीबाज नेते असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
या आंदोलनाच्या वेळी महिला आघाडीचे अध्यक्ष शारदा जाधव, युवा सेना जिल्हा संघटक राजू केंजळे, विद्यार्थी सेनेचे संभाजी पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन काटे, शहर प्रमुख निलेश मोरे, अमोल इंगोले, अमोल खुडे इत्यादी यावेळी उपस्थित होते. या आंदोलनासंदर्भात बोलताना रणजित भोसले म्हणाले, संजय राऊत यांच्या खोटारड्या बुरख्यातील विचारांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची आम्ही आज येथे दहन करत आहोत.
हेदेखील वाचा : Malegaon Sugar Factory News: सहकार मोडीत काढण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा डाव; चंद्रराव तावरेंची अजित पवारांवर टीका
गेल्या १५ दिवसांपासून या पुस्तकाची चर्चा होत आहे. संजय राऊत जेलमध्ये गेले, कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर नाही तर भ्रष्टाचाराचा डाग घेऊन गेले. बाळासाहेबांची शिवसेना व महाराष्ट्रातील हिंदुत्व संपवण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे. हा सुपारीबाज राऊत आमच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढत असेल तर यापुढे सहन केले जाणार नाही. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. यापुढे संजय राऊत साताऱ्यात आल्यास त्यांना चांगली अद्दल घडवू, असा इशारा त्यांनी दिला.
हेदेखील वाचा :‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत होतील’; ‘या’ बड्या नेत्याने केले विधान