महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार; इचलकरंजी महानगरपालिकेत भक्कम पर्याय देणार (Photo : iStock)
नागपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या लवकर व्हाव्यात असे लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिकांचीही इच्छा आहे. असे असताना राज्याचे महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यापर्यंत घेतल्या पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेतल्या पाहिजेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आवश्यक ते संसाधन राज्य सरकारला पुरवायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत या लांबलेल्या निवडणुकांमुळे अस्वस्थता असल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी मान्य केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सार लक्षात घेता ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. जर निवडणुका झाल्या तर महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 13000 नवीन नेते तयार होतील.
याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशिवाय स्थानिक विकास होऊ शकत नाही. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र काम केले तर विकासाला गती मिळेल. भाजपचे संघटनपर्व संपले. आतापर्यंत 1.5 कोटी सदस्य आहेत. भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. उद्या निवडणुका झाल्या तरी महायुती तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुका चार महिन्यांत घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशाप्रकारे, कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने देखील याबाबत महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता निवडणुक आयोगाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत.