shivsena Sanjay Raut upset over Sharad Pawar felicitating Eknath Shinde
मुंबई : मागील दोन वर्षांपासून राज्याचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. वर्षानुवर्षाची दुश्मनी असलेले पक्ष आज मांडीला मांडी लावून बसले आहे. तर राज्यातील युती पाहून अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय झाला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर ठाकरे गटाची देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वाढणारी जवळीक हा चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने हे ठाकरे गटाच्या जिव्हारी लागले आहे. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पवारसाहेब आम्हालाही राजकारण कळतं असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. ही आमची भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो”, असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत म्हणाले की, “ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगु होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो”, अशा कडक शब्दांत संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता – शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप होते. शरद पवार यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला. तसेच अलीकडच्या ५० वर्षात नागरी प्रश्नांसंबंधी जाण असलेला नेता कोण याची माहिती घेतली असता एकनाथ शिंदे यांचे नाव कटाक्षाने घ्यायला लागेल. महानगरपालिका राज्य सरकारमध्ये काम करताना त्यांनी नेहमीच नवी दिशा दाखवली. हे काम करीत असताना कोणताही पक्षीय अभिनिवेश न ठेवता नेहमी सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली, अशा शब्दांत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मात्र यामुळे ठाकरे गट नाराज झाला आहे.