
या वॉर्डमध्ये महायुतीतून शिंदे गटाचा उमेदवार आधीच रिंगणात असल्याने भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शिल्पा केळुसकर यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपचे नेते दत्ता केळुसकर यांनी ही लढाई ‘आर या पार’ची असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. (BMC Election 2026)
मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ
वॉर्ड १७३ मधून भाजपचे नेते दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर या भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी सादर केलेल्या अर्जासोबत डुप्लिकेट एबी फॉर्म जोडण्यात आला होता. आयोगाने तो वैध ठरवल्याने भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घडामोडींमुळे वॉर्ड १७३ मधील लढत अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता असून, भाजप आणि महायुतीतील समन्वयाची कसोटी लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
वॉर्ड क्रमांक १७३ मधील उमेदवारीवरून भाजपमधील अंतर्गत वाद चिघळताना दिसत आहे. भाजपचे नेते दत्ता केळुसकर यांनी पत्नी शिल्पा केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज माघारी न घेण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत ही लढाई ‘आर या पार’ची असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण स्थानिक आमदारांच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली असून, त्या सहकार्यापासून दूर जाण्याची आपली इच्छा नसल्याचे दत्ता केळुसकर यांनी सांगितले. मात्र, पुढील काही दिवसांत त्यांना सोडावे लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘आपण इतकी वर्षे काम केली आहेत, त्याबद्दल आता बोलणार नाही. निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. जे होईल ते शेवटचंच होईल,’ असे म्हणत त्यांनी आपला निर्धार स्पष्ट केला. दरम्यान, बंडखोर भूमिका घेतलेल्या दत्ता केळुसकर यांची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची माहिती आहे. या घडामोडींमुळे वॉर्ड १७३ मधील राजकीय लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्रमांक १७३ मधील उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. डुप्लिकेट एबी फॉर्मच्या आधारे दाखल करण्यात आलेला शिल्पा केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला असून, त्यामुळे भाजप आणि महायुतीतील शिंदे गटाची कोंडी झाल्याचे चित्र आहे. सुरुवातीला भाजपने (BJP) प्रभाग क्रमांक १७३ मधून दत्ता केळुसकर यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, जागावाटपाच्या सूत्रानुसार हा प्रभाग शिंदे यांच्या शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेकडून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या सूचनेनुसार दत्ता केळुसकर यांनी एबी फॉर्म पक्षाकडे परत केला. मात्र, त्याआधी त्यांनी त्या एबी फॉर्मची रंगीत झेरॉक्स प्रत काढून ठेवली होती. त्यानंतर दत्ता केळुसकर यांनी पत्नी शिल्पा केळुसकर यांना प्रभाग क्रमांक १७३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले.
शिल्पा केळुसकर यांनी एक उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून, तर दुसरा अर्ज भाजपच्या एबी फॉर्मच्या रंगीत झेरॉक्ससह सादर केला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून शिल्पा केळुसकर यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. मात्र, एबी फॉर्मच्या रंगीत झेरॉक्ससह दाखल करण्यात आलेला अर्ज वैध ठरल्याने केळुसकर दाम्पत्याच्या या खेळीने शिंदे गटाच्या उमेदवाराची अडचण वाढली असून, भाजपचीही पंचाईत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे वॉर्ड १७३ मधील लढत अधिकच गुंतागुंतीची आणि चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.