Shivsena Uddhav Thackeray press conference live in mumbai on waqf amendment bill
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. महायुती सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. अधिवेशन संपल्यानंतर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली जात आहे. अधिवेशन हे औरंगजेबाची कबर, अबु आझमी वक्तव्य, नागपूर दंगल अशा अनेक मुद्द्यांवरुन गाजले. मात्र अधिवेशनात विकास कामांवर कमी चर्चा झाल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अधिवेशनातील चर्चेच्या मुद्द्यापासून ते सौगाद-ए-मोदी या योजनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अपयश आणि अस्वस्थता लपवणारे हे अधिवेशन होते. या 100 दिवसांत काय करणार याचा महायुतीने संकल्प केला होता. मात्र त्यापैकी एकही गोष्ट या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही. त्यांचा संकल्प कुठेही दिसला नाही. पण महायुतीचं सरकार आल्यानंतर बीड सरपंचांची हत्या झाली, सोमनाथ सुर्यवंशी हत्या, स्वारगेट बलात्कार प्रकरण, रोज भ्रष्टाचाराचे गुन्हे होत आहेत. संपूर्ण मुंबई खोदून ठेवली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार होते ते सुद्धा दिले नाहीत,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ते पुढे म्हणाले की, “मतं घेताना आधी पैसे दिले नंतर आता लाडक्या बहिणींमध्ये वर्गवारी केली जात आहे. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पण महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी जे कोंब फुटत आहे ते काही कमी झालेले नाहीत. सगळं देऊन सुद्धा असं का वागत आहेत, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना देखील पडला आहे. अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं तर या अधिवेशनाने एक उत्तम गाणं दिलं. ते गाणं आज देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक मुखात गुणगुणत आहे. हे या अधिवेशनाचे फलित मानावे लागेल. हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून कामरापर्यंत आहे. बाकी काहीच नाही. सत्ताधाऱ्यांनी स्वतःला अधिवेशनातून आपण काय दिलं हे विचारावं. यामध्ये फक्त सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. सत्ताधारी अधिवेशनात फक्त पाशवी बहुमताचा माज दाखवत होते,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांनी सौगात-ए-मोदी या मोदी सरकारच्या योजनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “शिवसेना मुस्लीम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे आणि मुस्लीम समाज आमच्या पाठिशी उभा राहिल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते. यांनी लगेच आरोळी उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं. महाराष्ट्रातील काही बोगस हिंदूत्ववादी ओरडत बसतात त्यांना एक पाचट बसली आहे. कारण ईदच्या निमित्ताने सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. 36 लाख मुस्लीम कुटुंबियांच्या घरी 32 हजार भाजपचे कार्यकर्ते हे त्यांना सौगात-ए-मोदी देणार आहेत. मात्र हे काय सौगात-ए-मोदी नाही तर हे सौगात-ए-सत्ता आहे. हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं हे निर्लज्ज उदाहरण आहे,” असे स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राच्या निवडणूकीवेळी बटेंगे तो कटेंगे असे नारे देण्यात आले. आता सौगात म्हणजे भेट द्यायला चालले आहेत. वर्षेभर मुस्लीम समाजाचे नाव्याने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची. असा हा प्रकार आहे. आमच्या येथे काही उडाणटप्पू आहेत. त्यांचा उल्लेख अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये केला आहे. ते सुद्धा आता टोपी घालून सौगात घेऊन जातात हे आम्हाला बघायचं आहे. तुम्ही आमच्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप करतात तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता त्यांचे हे ढोंग उघड पडलं आहे. मोदी जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोलले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार. आता हिंदूंच्या मंगळसुत्राचे रक्षण कोण करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.